राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत बुधवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले. मात्र भाजापाने याला विरोध करत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गुरुवारी सकाळी पुणे महापालिकेसमोर भाजपा पुणे शहराच्या वतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.




भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी आंदोलनासाठी उपस्थित होते. नवाब मलिक यांच्यावर बुधवारी मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीकडून कारवाई झाली आहे. अशा नेत्यावर कारवाई होऊन, आता शिक्षा झाली पाहिजे. पण आता नवाब मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घ्यावा आणि त्यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असे जगदीश मुळीक यांनी म्हटले.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले होते. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही त्यांच्याबरोबर होते. या कारवाईबाबतची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करायची असल्याचे सांगून ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. मलिक यांनी काही वेळ मागून घेतला. त्यानंतर ते ‘ईडी’ कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमीर हे त्यांच्याबरोबर होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.