Pune Municipal Corporation BJP corporators clash video: बाणेर परिसरात महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थिनी व महिलांसाठीच्या वसतिगृहाच्या कामावरून भारतीय जनता पक्षाच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकींना अपशब्दही वापरण्यात आले. पुणे महापालिकेत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची सायंकाळपर्यंत जोरदार चर्चा सुरू होती.

वसतिगृहाच्या रखडलेल्या कामासाठी तीन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. त्यामधील टक्केवारीतून ही खडाजंगी झाल्याचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यामध्ये झालेल्या या खडाजंगीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. महापालिकेच्या भवन विभागाच्या कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. झालेल्या प्रकाराची बाहेर वाच्यता होऊ नये, यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. मात्र, भांडणाचा व्हिडिओच प्रसारित झाल्याने या प्रकाराचा बोभाटा झालाच.

महापालिकेच्या भवन विभागाच्या वतीने बाणेर येथे मागासवर्गीय, अदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारले जात आहे. या कामाची सुरुवात होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी हा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न केले होते. प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी काळे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने राजश्री काळे यांना उमेदवारी दिली नाही. औंध-बाणेर प्रभागातून रोहिणी चिमटे उमेदवार होत्या. त्या विजयीही झाल्या. वसतिगृहाचे काम बंद असल्याबाबत बुधवारी काळे भवन रचना विभागात आल्या होत्या. तेथे चिमटे आणि संबधित काम करत असलेले ठेकेदार यांच्यात चर्चा सुरू होती. त्या वेळी या दोन्ही आजी-माजी नगरसेविकांमध्ये वाद झाला.

विद्यमान नगरसेविका चिमटे म्हणाल्या, निवासी वसतिगृहाचे काम माझ्या प्रभागात चालू आहे. या कामासंदर्भात काही सोसायट्यांच्या तक्रारी आहेत. त्याची विचारणा करण्यासाठी भवन रचना विभागात गेले होते. या प्रकल्पाच्या निविदेला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, लवकरच काम पूर्ण केले जाईल, असे विभागाचे प्रमुख बिपीन शिंदे यांनी सांगितले.

माजी नगरसेविका राजश्री काळे म्हणाल्या, या कामाची अंतिम निविदा काढण्यात आली आहे. या कामाच्या ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून कामात अडथळा आणला जात आहे. टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका, अशी धमकी ठेकेदाराला दिली जाते. अशा प्रकारे काम रोखणे योग्य नाही. यावरून वाद झाला.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, झालेला प्रकार चुकीचा आहे. महापालिकेत झालेल्या या प्रकाराबाबत आजी-माजी सदस्यांना समज दिली असून, हा वाद अधिक न वाढविण्याची सूचना केली आहे.