पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये टक्केवारीच्या वादातून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमधील वाद संपुष्टात आला. त्रयस्थ व्यक्तींनी निर्माण केलेल्या गैरसमजांमधून हा वाद झाला होता. मात्र, आता दोन्ही सभासदांमधील गैरसमज दूर झाले असून, हे प्रकरण शांत झाल्याची माहिती देण्यात आली. पुणे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बीडकर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला आहे.

महापालिकेच्या भवन विभागाच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात तीन दिवसांपूर्वी वाद झाला. बाणेर परिसरात महापालिकेच्या वतीने अदिवासी समाजातील महिलांच्या वसतिगृहाच्या कामातील टक्केवारी मिळावी, यासाठी काम थांबविल्याचा आरोप माजी नगरसेविका काळे यांनी विद्यमान नगरसेविका चिमटे यांच्यावर केला होता. या वादामध्ये शिवीगाळही करण्यात आली होती.

याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकारानंतर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे सभागृहनेते गणेश बीडकर यांनी भाजपच्या या दोन्ही नगरसेविकांची एकत्र बैठक घेऊन हा वाद मिटविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘गैरसमजातून हा वाद झाला होता. त्रयस्थ व्यक्तीमुळे हा वाद वाढला. व्हायरल व्हिडिओची तपासणी करून संबधित व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे बीडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपमध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही. या प्रकरणामध्ये ‘टक्केवारीचा कोणताही मुद्दा नाही. त्रयस्थ व्यक्ती मुळे चुकीचा गैरसमज करून घेण्यात आला. त्यामुळे विनाकारण वाद वाढला. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जाईल,’ असेही गणेश बीडकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी टोचले कान ?

पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आजी आणि माजी नगरसेविकांमध्ये टक्केवारी मधून झालेल्या वादाचा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत गेला होता. याची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली. काही कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेतील सभागृहन नेते गणेश बिडकर यांच्याशी संवाद साधत झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणातील सूत्र तातडीने हलली. सभागृह नेते बिडकर यांनी दोन्ही नगरसेवकांबरोबर संवाद साधत वाद मिटवून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत आवाज मिटला असल्याचे सभागृहनेते बिडकर यांनी दोन्ही आई माझे नगरसेविकांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले. येणाऱ्या काळात अशाप्रकारे कोणताही वाद होऊ नये अशा सूचना मुख्यमंत्री यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना दिल्याचे बोलले जात आहे.