पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत मंजूर करून घेतल्यानंतर १५ दिवसांनंतरही भारतीय जनता पक्षाने प्रशासनाला काहीही कळविलेले नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सप्टेंबर महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे लेखी कळविले आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे कारण देऊन दोन ते तीन दिवसांत प्रशासनाला या बाबत पत्र दिले जाईल, असे सांगितले.
पुणे महापालिकेच्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्ष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सभासदांचे वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा ठराव मान्य केला. या बाबतचा प्रस्ताव मांडताना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी प्रस्ताव आणण्यापूर्वी चर्चा न केल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. भाजपच्या नेत्यांनी हा ठराव मांडताना सर्व पक्षीय गटनेत्यांशी चर्चा का केली नाही, अशी विचारणा करण्यात आली. महापालिकेतील सर्व पक्षांच्या नगरसेवकांचे वर्षभराचे मानधन देण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा न करता सत्ताधारी भाजपला कोणी दिला? अशी विचारणा देखील या सभेत करण्यात आली होती.
विरोधक श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपने आपल्या १२६ नगरसेवकांचे वर्षभराचे मानधन देण्याचा सुधारित प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडून तो मंजूर करून घेतला. मात्र, या ठरावानंतर आवश्यक लेखी संमती मात्र अद्याप पर्यंत भाजपकडून प्रशासनाला देण्यात आली नाही. त्यामुळे याची अंमलबजावणी प्रशासनाला करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) २७ नगरसेवकांनी मात्र मानधन देण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. यापूर्वीचे मानधन वितरित झाल्याने ऑक्टोबरनंतरचे मानधनच देता येणार असून, त्यासाठी दर महिन्याला स्वतंत्र प्रक्रिया करावी लागणार आहे. तसेच, तहकुबीच्या सूचनेची अंमलबजावणी नगरसेवकांच्या संमतीनेच महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे. सर्वसाधारण सभेत दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांना धारेवर धरणाऱ्या भाजपने स्वतःच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आता विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपने सर्व सभासदांचे वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पत्र दिले नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत दर महिन्याचे नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करावे, असे पत्र दिले जाईल. पुढील एक वर्षाचे मानधन दिले जाणार आहे, असे भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
