पुणे : भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी बी. एल. संतोष हे आज, (शुक्रवारी) पुणे दौऱ्यावर येत असून, विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर इन्स्टिट्यूटमधील सभागृहात ते भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेणार आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता पक्षाच्या संघटनात्मक कारभाराची झाडाझडती घेतली जाणार आहे. या बैठकीत पदवीधर निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्याबरोबरच पक्षांतर्गत गटबाजी, संघटनात्मक समन्वयाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील कामकाजाचा लेखाजोखा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्ह्यात भाजपचे मोठे संख्याबळ असतानाही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढलेली असताना मतपेटीत मात्र त्याचे प्रतिबिंब उमटले नाही. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संतोष यांच्याकडे संपर्क अभियानाचे दायित्त्व आहे. या दौऱ्यात ते संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेणार असून, पक्ष बांधणीत कुठे कमी पडतो आहोत, यावर ते चर्चा करण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचा निकाल लागून काही तास उलटले आहेत. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या झालेल्या पराभवाची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह पक्षाचे शहरातील पदाधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असूनही नागरिकांशी आणि मतदारांशी संपर्क राखण्यात पक्ष कुठे कमी पडतो आहे, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांच्या प्रभागातील कामगिरीपासून ते पक्षाच्या शहरस्तरीय संघटनात्मक रचनेपर्यंत विविध विषयांचा ऊहापोह होऊ शकतो. आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि नगरसेवकांना कामकाजाबाबत स्पष्ट संदेश दिला जाण्याचीही शक्यता आहे.

पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर होणारी ही पहिलीच महत्त्वाची बैठक असल्याने केवळ संघटनात्मक आढाव्यापुरती ती मर्यादित राहणार की स्थानिक नेतृत्वाच्या कामगिरीवरही बोट ठेवले जाणार, याबाबत उत्सुकता आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यातच पराभवाचा धक्का बसल्याने केंद्रीय नेतृत्वाकडून स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांची नेमकी कशी ‘शाळा’ घेतली जाते, याकडे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय सरचिटणीसांचा उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी शहरातील खासदार आमदार महापालिकेतील नगरसेवक शहर पदाधिकारी तसेच महत्त्वाच्या पदांवर काम करणारे भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्षात काम करताना भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे स्थानिक नेते कसे दुर्लक्ष करतात याच्या तक्रारी देखील काही पदाधिकाऱ्यांकडून केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.