नावात काय आहे अस शेक्सपियरने म्हटले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र या उलट झालं असून नाव आणि प्रसिद्धीसाठी धोका पत्करून भाजपा आमदाराच्या भावाच्या कन्स्ट्रक्शन ऑफिसवर रॉकेलने पेटलेल्या बाटल्या फेकल्याचा प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी चार जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी एकाने घटनेसाठी दुचाकी दिली होती. तर, इतर दोघे अल्पवयीन आहेत, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या चंद्ररंग कन्स्ट्रक्शन कार्यालयावर तीन अज्ञातांनी रॉकेलने पेटलेल्या दोन बाटल्या फेकल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहर आणि स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आरोपींना तात्काळ अटक करा असा सूर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापौर उषा उर्फ माई ढोरे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी भेट दिली होती.

काही तासांमध्येच घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना ताब्यात घेण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपी हे कासारवाडी परिसरात राहणारे आहे. आरोपींना ताम्हणी घाटातून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, त्यांनी नाव आणि प्रसिद्ध होण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेलने पेटवलेल्या बाटल्या फेकल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. म्हणतात ना, ‘बदनाम हुये तो क्या हुआ अखिर नाम तो हुआ’ असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल.