पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य अमोल बालवडकर यांना देण्यात आलेला १५ कोटी रुपयांचा विकासनिधी शून्य करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मतदानाच्या जोरावर मंजूर करण्यात आला. ‘भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या आदेशावरून आणि दबावाखाली स्थायी समितीमार्फत हा अन्यायकारक ठराव आणून हा निधी शून्य करण्यात आला,’ असा आरोप बालवडकर यांनी केला.

भाजपने बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मान्य केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून चौकशीचा प्रस्ताव बालवडकर यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिला होता. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला.

बालवडकर यांनी हा प्रस्ताव दिल्याने भाजपच्या सदस्यांनी बालवडकर यांना वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्य करून घेतला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला. मात्र, मतदान घेऊन भाजपने हा प्रस्ताव मान्य करून घेतला.

भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने राजकीय सूडबुद्धीतून लक्ष्य केल्याचा आरोप बालवडकर यांनी केला. ‘कोथरूड विधानसभा मतदारसंघात कामे करताना कमी खर्चाच्या कामांची फुगवून बिले काढण्यात आली. या संदर्भातील प्रशासकीय चौकशीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला. त्या ठरावात कोणाचेही नाव घेतले नव्हते; असे असतानाही सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दबावाखाली माझा निधी शून्य करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत दाखल करून मान्य करून घेतला,’ असे बालवडकर यांनी सांगितले.

सभागृहात हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सभासदांमध्ये वाद झाला. त्यावेळी ‘ आपली मैत्री राज्यात असेल पुण्यात नाही यापुढे आमच्याकडून सहकार्याची भूमिका ठेवू नका’ असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ऐकवले. त्यावर ‘ असे करणार असाल तर यापुढे सर्व कामे नियमानित झाली पाहिजेत. ती नियमानेच कशी होतील याकडे आम्ही लक्ष ठेवू ‘ असे प्रत्युत्तर निलेश निकम यांनी दिले. या प्रस्तावावर बोलण्याची संधी मिळावी अशी विनंती बालवडकर यांनी केली मात्र महापौर मंजुषा नागपुरे यांनी त्यासाठी नकार देत मतदान घ्यावे, असे आदेश दिले.

‘पदाने मोठ्या; पण संकुचित नेत्यांचा दबाव’

सर्वसाधारण सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बालवडकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मी नागरिकांच्या हितासाठी काम करत आहे. मात्र, पक्षात जे नेते पदाने मोठे आहेत; पण मनाने अत्यंत संकुचित आहेत, त्यांनी निधी जाणीवपूर्वक रोखला आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि म्हाळुंगे या परिसरातील रस्ते, उद्याने, मैदाने आणि स्वच्छतागृहे यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी हा सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या आदेशावरून आणि दबावाखाली स्थायी समितीमार्फत हा अन्यायकारक ठराव आणून हा निधी शून्य करण्यात आला,’ असा आरोप बालवडकर यांनी केला.