पुण्याच्या राजकारणात सध्या पत्राद्वारे वाकयुद्ध सुरू आहे. महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवून पुण्यातील खुशाली कळवित आहेत. ‘इकडील स्थिती काही चांगली नाही’, हे सांगून तक्रारीचा पाढा ऐकवत आहेत. खोडी कोणी काढली? हे स्थानिक नेते मित्रपक्षाच्या नेत्यांना उदाहरणांसह स्पष्टीकरण देत आहेत. मात्र, नेते फक्त पत्रवाचन करून मनोमन करमणूक करून घेत असावेत, अशी स्थिती आहे. कोणत्याच नेत्याने ‘कळावे, लोभ असावा’ असा लखोटाही पाठविलेला नाही. त्यामुळे पुणे महापालिकेचा सध्या ‘पत्रापत्री’ कारभार सुरू असल्याचे दिसून येते. ‘राष्ट्रवादी’च्या दोन नगरसेवकांच्या प्रभागांना शून्य विकास निधीवरून सुरू झालेल्या या पत्रयुद्धात एकमेकांवर कुरघाड्या करण्यात सत्ताधारी आणि विरोधक मशगुल असताना यांना भरभरून मते कशासाठी दिली? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
सत्ताधारी भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ हे आतापर्यंत गुण्यागोविंदाने कारभार चालवित आले होते. आजवर ‘राष्ट्रवादी’ हा पुणे महापालिकेत विरोधी पक्ष असला, तरी त्यांनी विरोधाची जाणीव करून दिली नव्हती. त्यामुळे विरोधी पक्षनेते हे पद कागदोपत्रीच होते. मात्र, कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीबाबत ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक आणि पूर्वाश्रमीचे भाजपचे अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीत प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिले आणि वादाची ठिणगी पडली. भाजपने बालवडकर आणि टिंगरे यांच्या प्रभागांचा विकासनिधी शून्य करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेतला आणि पत्रातून वाकयुद्ध सुरू झाले.
या पत्राला सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सुरुवात केली. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून तक्रार केली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या कोथरुड विधानसभा मतदार संघातील विकासकामांवर ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी संशय घेणे हे मैत्रीत योग्य नसल्याचे दाखवून दिले.
महापालिकेच्या निवडणुकीत पाटील आणि बालवडकर यांनी एकमेकांना आव्हान दिले होते. तो राग बालवडकर यांनी कोथरुडमधील विकासकामांच्या चौकशीच्या मागणीने काढला. मात्र, भाजपने त्यांना शून्य विकासनिधी देऊन आमच्या वाटेला गेलात, तर काय करू शकतो, हे दाखवून दिले. बीडकर यांच्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पुणे महापालिकेत मित्रपक्ष असणाऱ्या भाजपकडून ‘राष्ट्रवादी’वर अन्याय होत असून, तातडीने हस्तक्षेप करण्याचे गाऱ्हाणे मांडले. भाजपने आतापर्यंत केलेल्या अन्यायाचा पाढाच त्यांनी पत्रातून मांडला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची नव्याने रचना केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू शकले नाही, हे दु:ख त्यांनी सांगितले. राजकीय मतभेद असले, तरी विकासकामांमध्ये ‘राष्ट्रवादी’ ही भाजपला कायम साथ देत असल्याचे पटवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘भारत मंडपम्’चे उदाहरण त्यांनी दिले. विमाननगर येथील ‘भारत मंडपम’च्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या सूचनेनुसार ‘राष्ट्रवादी’ने पाठिंबा दिला, याची आठवण त्यांनी पत्राद्वारे करून दिली.
टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भाजपवर आरोप केल्यानंतर, आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे आक्रमक झाले. घाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे. पुणे पालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही महायुतीचा धर्म पाळून ‘राष्ट्रवादी’ला योग्य ते प्रतिनिधित्व आणि निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा दावा घाटे यांनी पत्राद्वारे केला आहे. मात्र, ‘राष्ट्रवादी’ने ही मैत्री विसरून अनेकदा विरोधी पक्षाची भूमिका बजावली असल्याची वानगीदाखल काही उदाहरणे दिली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेत काळ्या फिती बांधून केलेला निषेध, विकासकामांच्या प्रस्तावांना दिलेला विरोध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘तिरंगा यात्रे’वर महापौर मंजूषा नागपुरे यांच्याबाबत केलेली वादग्रस्त विधाने, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीच्या चौकशीची केलेली मागणी हे ‘राष्ट्रवादी’चे कारनामे त्यांनी दाखवून दिले.
या पत्रापत्री कारभारात पुणेकर कोठे आहेत? पुण्याचा विकास भाजप आणि ‘राष्ट्रवादी’च करतील, असा भाबडा विश्वास ठेवून या दोन्ही पक्षांना पुणेकरांनी भरभरून मते दिली. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपापल्या निधीसाठी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. पुणेकरांनी मते ही यासाठी दिली का, याची आठवण दोघांनीही ठेवावी. अन्यथा पुणेकरांनी पत्रलेखन सुरू केल्यास काय होईल, याचा अंदाज दोघांनाही असावा.
sujit.tambade@expressindia.com
