पुणे : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत न बुजविल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गुरुवारी घूमजाव केले. महापालिका प्रशासनाने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केल्याने आंदोलन करणार नसल्याचे आता स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात सूस-म्हाळुंगे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. ‘आठ दिवसांत खड्डे न बुजविल्यास रस्त्यावर उतरू,’ असा इशारा भिमाले यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिला होता.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर भिमाले यांना याबाबत विचारण्यात आले असता, ते म्हणाले, ‘काम सुरू झाल्यामुळे आता आंदोलनाची गरज राहिलेली नाही. काम सुरू झाले नसते, तर आंदोलन केले असते.’ महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच खड्डे दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनीच आता माघार घेतल्याने यापुढील काळात खड्डे दुरुस्ती होईल की नाही अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
प्रशासनाने आठ दिवसांत किती खड्डे बुजविले, असे विचारले असता, त्याची आकडेवारी भिमाले यांच्याकडे उपलब्ध नव्हती. मात्र, पूर्वीचे खड्डे आणि दुरुस्त केलेल्या खड्ड्यांची छायाचित्रे त्यांनी दाखवली. भिमाले म्हणाले,‘कोणतीही ठोस आकडेवारी सांगण्याऐवजी मी माझ्या भागात आणि बिबवेवाडीत भेटी दिल्या, त्याची छायाचित्रे आहेत.’
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील रस्त्यांसह कात्रज-कोंढवा रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. याबाबत, ‘काम वेगाने चालू आहे’ असे सांगून भिमाले यांनी अधिक बोलणे टाळले.
रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आंदोलनाची गरज नाही. प्रशासनाचे काम समाधानकारक आहे. या कामाची छायाचित्रे प्रशासनाने पाठविली आहेत, असे म्हणत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.
अद्यापही अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. महापालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचा दावा केला असला तरी खराब रस्त्यातून वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. कात्रज कोंढवा रस्त्याबरोबरच वारजे, सिंहगड, येरवडा लोहगाव, धानोरी या भागातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी वारंवार करूनही महापालिका त्याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
