पुणे : ‘भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘आणीबाणीचा काळा दिवस’ या विषयांवरील कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे जुनेच कार्यकर्ते आले आहेत. २०१४ नंतर नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी आता अशा कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे,’ अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी व्यक्त केली. या वेळी ‘आणीबाणी’वर बोलताना त्यांनी ‘लोकशाहीचे आपणच खरे रक्षणकर्ते आहोत,’ असे सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आणीबाणीचा काळा दिवस’ या विषयावर जावडेकर बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सचिव ॲड. वर्षा डहाळे, शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर, माजी नगरसेवक अनुपमा लिमये आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ‘लोकतंत्र सेनानीं’चा सन्मान करण्यात आला.
प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘आपण आणीबाणीतून बाहेर पडलो, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्याई. संघाच्या स्वयंसेवकांनी आणीबाणीविरोधातील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. आता हे आरक्षण रद्द करणार, संविधान बदलणार असे आरोप करणाऱ्यांनीच संविधान बदलले होते. याउलट, संविधानाची पुनर्स्थापना करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. भाजपच्या, संघाच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीचे रक्षण केले. ‘आपण’च खरे लोकशाहीचे रक्षणकर्ते आहोत.’
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला नख लावण्याचे काम काँग्रेसने केले होते. आता ते संविधानाची प्रत हातात घेऊन आंदोलन करतात. मात्र, काँग्रेसनेच संविधानाची मोडतोड केली होती,’ असेही जावडेकर यांनी नमूद केले.
प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘आणीबाणीनंतर संविधानात मोठे बदल करण्यात आले. प्रास्ताविकेत ‘सेक्युलरिझम’ आणि ‘सोशालिझम’ या शब्दांचा समावेश करण्यात आला. मात्र, आपल्या देशात मूळातच सर्वधर्मसमभावाची भावना रुजली आहे. काँग्रेसने केलेली संविधानाची मोडतोड सुधारण्याचे काम आपण केले. लोकशाहीच्या संरक्षणासाठी सुमारे एक लाख दहा हजार नागरिकांनी संघर्ष केला. हा देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व लढा होता. या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.’
‘आणीबाणीच्या काळात संविधानातील मूलभूत मूल्यांवर गदा आणली गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांवर निर्बंध आणले. माध्यमांवर ‘सेन्सॉरशिप’, समाजात भीती आणि संभ्रमाचे वातावरण होते. राजकीय कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने अटक करण्यात आली. अनेकांना तुरुंगवास भोगावे लागले, अत्याचार सहन करावे लागले. सक्तीची नसबंदी मोहीम राबवण्यात आली. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते,’ असेही जावडेकर यांनी नमूद केले.
‘लोकशाहीच्या संरक्षणासाठी सुमारे एक लाख दहा हजार नागरिकांनी संघर्ष केला. हा देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व लढा होता. या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी समाजाने कायम सजग राहिले पाहिजे,’ असेही जावडेकर यांनी सांगितले.
