पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलने करण्यासाठी स्वतंत्र मैदाने आरक्षित करावीत, असा प्रस्ताव महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दाखल केला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचा भारतीय जनता पक्षाने (भाजप) धसका घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र, राज्यासह महापालिकेत भाजप सत्ताधारी पक्ष म्हणून काम करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने होत आहे. ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन एस. एम. जोशी पुलावर होत असल्याने तेथून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या आंदोलनाचा त्रास नागरिकांना होत असल्याने आंदोलन, उपोषणांसाठी दोन स्वतंत्र मैदाने आरक्षित करून द्यावीत, असा प्रस्तावच स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी हा प्रस्ताव दिला असून, त्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे.
केंद्रासह राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मागील काही महिन्यांपासून केंद्र, राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात नाराजी विजय व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेले गैरप्रकार, विविध परीक्षांमध्ये होत असलेली पेपर फुटीचे प्रकार यासह मतदार यादी दुरुस्ती मोहीम, मराठा समाज मागण्या, ओबीसी आरक्षण अशा विविध प्रश्नावरून आंदोलने, उपोषण सुरू आहेत.
शहराच्या विविध भागात ही आंदोलने केली जातात. मागील काही महिन्यांपासून सरकारच्या विरोधात वाढत असलेला रोष पाहता आंदोलनांचे प्रमाण देखील वाढले आहे. याचा धसका सत्ताधारी भाजपने घेतला असून आंदोलनासाठी जागा निश्चित केल्यास त्याच भागात आंदोलने होतील आणि त्यावर नियंत्रण ठेवता येईल, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा महापालिकेत जोरदार सुरू झाली आहे.
‘आंदोलनांसाठी स्वतंत्र मैदान निश्चित झाल्यास आंदोलकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी निश्चित आणि अधिकृत जागा उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्रशासनालाही बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा आणि इतर व्यवस्थापन करणे अधिक सोपे होऊ शकते. यामुळे आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवून सर्वसामान्य पुणेकरांचा त्रास कमी करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, यासाठी हा प्रस्ताव दिला आहे,’ असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.
बीडकर म्हणाले, लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, तसेच निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते, चौक किंवा वाहतूक मार्गांवर आंदोलन झाल्यास त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होतो. त्यामुळे आंदोलनांसाठी स्वतंत्र मैदाने निश्चित झाल्यास आंदोलकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि प्रशासनालाही बंदोबस्त व वाहतूक व्यवस्थापन करणे सोपे जाईल.
