पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढवून सत्तेत आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यातील वाद समोर येण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. पण, उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान दिला जात नसल्याची खंत उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली.
‘शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांसाठी महापौर यांच्याबरोबर उपमहापौर यांचे नाव पत्रिकेत टाकले जाते. उपमहापौरपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी योग्य मान दिला जात होता. मात्र, आता त्या सन्मानाचा विसर पडला आहे,’ असे उपमहापौर वाडेकर म्हणाले. यानिमित्ताने महापालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजप आणि आरपीआय मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धेनिमित्त उपमहापौरपदाला जाणीवपूर्वक डावलले जात आहे. महापौर चषक स्पर्धेतील एक स्पर्धा औंध-बोपोडी या प्रभागात आयोजित करूनही त्या कार्यक्रमासाठी उपमहापौर म्हणून डावलण्यात आले,’ असे वाडेकर म्हणाले. ‘हे प्रकार नजरचुकीने होतात, की जाणीवपूर्वक हेच समजत नाही,’ असेही ते म्हणाले.
महापालिकेची निवडणूक लढविताना भाजपने मित्रपक्ष ‘आरपीआय’साठी काही जागा सोडल्या होत्या. या जागांवर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळविला. महापालिकेत सत्ता स्थापन करताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना उपमहापौरपद द्यावे, अशा सूचना केल्या. त्यामुळे उपमहापौरपद परशुराम वाडेकर यांना देण्यात आले.
‘महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भाजपने ‘आरपीआय’साठी उपमहापौरपद सोडले असले, तरी या पदासाठीचा सन्मान भाजपकडून मिळत नाही. महापौर कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांना उपमहापौरांना निमंत्रण पाठविले जात नाही. अनेकदा बैठकीनंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का,’ अशी विचारणा महापौरांकडून होते. संबंधित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जाईल, असे सांगून महापौरांकडून केवळ समजूत काढली जाते,’ असे उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.
उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, महापालिकेत आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकांसाठी व कार्यक्रमांसाठी उपमहापौरांना बोलाविले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही बैठकांना महापौरांशेजारी उपमहापौरांची बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही. शहरातील विविध भागांत झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांमध्ये बसून साक्षीदार झालो. या पदापर्यंत संघर्ष करत आलो. यापुढील काळातही संघर्ष करत राहणार आहे.
