स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.याचा अभियनाचा शुभारंभ आज(मंगळवार) पुणे शहर भाजपाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमास खासदार गिरीश बापट, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, मुरलीधर मोहोळ, सिध्दार्थ शिरोळे, योगेश टिळेकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येन उपस्थित होते. याप्रसंगी भाजपाकडून सर्जिकल स्ट्राईकचे नायक लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, या कार्यक्रमास स्वातंत्र्यवीरांचे कुटुंबीय, शहीदांचे कुटंबियांची देखील उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्वातंत्र्याचे हे ७५ वर्ष हा अमृतकाळ आपल्याला एका ध्येयाकडे नेणारा आहे. त्याची सुरुवात ही आपण हर घर तिरंगाच्या माध्यमातून करतोय. एवढंच नाही तर १४ ऑगस्ट रोजी आपल्याला विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळायचा आहे. मनवायचा नाही, पाळायचा आहे. कारण, विभीषिका मनवली जात नाही विभीषिका पाळली जाते.”

तसेच, “आपण सर्वजण अखंड भारतामध्ये विश्वास ठेवणार आहोत. परंतु जोपर्यंत अखंडभारत तयार होत नाही. तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या मनात हे स्वप्न राहिलं पाहिजे आणि शल्य देखील राहिलं पाहिजे, की हो या दिवशा माझ्या देशाचं विभाजन देखील झालं होतं. इस्त्राइलची भूमी दोन हजार वर्षानंतर ज्यू लोकांना मिळाली होती. आपल्याला दोन हजार वर्ष वाट पाहायची नाही. अखंड भारताचं स्वप्न आम्हाला याची देही याची डोळा पाहायचं आहे आणि त्याची पहिली सुरुवात ही कलम ३७० हटवण्यापासून झाली आहे. कारण, आमच्या देशातीलच काश्मीर हे जर आम्ही आमचं म्हणू शकत नव्हतो, तर अखंड भारताचं स्वप्न काय होतं?, परंतु पंतप्रधान मोदींनी ते करून दाखवलं आणि आज आमचं काश्मीर कलम ३७० हटल्यामुळे पूर्णपणे अबाधित, अखंडित आमचंच आहे. कोणी त्यावर दावा सांगू शकत नाही. मला विश्वास आहे की यानंतर आता काय, कधी हे सांगण्या इतकी मला माहिती नाही. माझी ती क्षमता नाही, परंतु माझं स्वप्न आहे की जे पाकव्याप्त काश्मीर आहे, ते देखील भारताचं होईल आणि जो खरा अखंड भारत होता तो देखील एक दिवस तयार होईल. पण तोपर्यंत विभाजन विभीषिका दिवस पाळून आमच्या प्रत्येकाच्या मनातील शल्य हे आम्ही जिवंत ठेवणार आहोत.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

याचबरोबर, “एवढंच नाही तर आपल्याला ११, १२ आणि १३ ऑगस्ट रोजी प्रभातफेऱ्या देखील काढायच्या आहेत. कारण, स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या जी काही उर्जा होती, ती प्रभात फेऱ्यांमध्ये होती. हे सर्व कार्यक्रम आपल्याला मनातून करायचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याशी जोडायचं आहे. मला विश्वास आहे येणारं भविष्य आणि भवितव्य हे भारताचं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सामर्थ्यशील आणि सर्वांपर्यंत विकास पोहचवणारा भारत आपल्याला आपण तयार करू.” असा विश्वास देखील फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjps har ghar tiranga campaign launched in the presence of devendra fadnavis msr
First published on: 09-08-2022 at 18:48 IST