पुरोगामी शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून भोंदूंकडून फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. ऋषीकेश वैद्य नावाच्या भोंदूने दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण, पुण्यात गेल्या काही काळात अशा घटना वाढत आहेत, ही यातील चिंतेची बाब.

‘दुर्धर विकाराने ग्रस्त असलेल्या मुलींना बरे करतो,’ असे सांगून कोथरूड भागातील एका संगणक अभियंत्याची भोंदूने १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. संगणक अभियंत्याला भोंदूने ब्रिटन आणि कोथरूडमधील घरही विकण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. भोंदूगिरी आणि त्याला बळी पडणारे, यामुळे पुरोगामी शहरात अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट आवळला जातो आहे, हे अशा घटनांवरून अधोरेखित होत आहे.

पुणे शहरात अनेक समाजसुधारकांनी अनिष्ट प्रथा, रूढी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. समाजसुधारणेची परंपरा देशभरात रुजली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये (महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३) गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्याच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केला. अंधश्रद्धेविरोधातील लढा त्यांनी पुण्यातूनच उभारला. त्या प्रयत्नांतून २०१३ मध्ये जादूटोणा प्रतिबंध कायद्याची निर्मिती झाली.

सन २०१३ ते २०२५ पर्यंतचा आढावा घेतला, तर पुणे शहरात जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये ७९ गुन्हे दाखल झाले. राज्यातील अन्य शहरांमध्ये या कायद्यान्वये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पाहता पुण्यात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, तसेच अहिल्यानगर या शहरांत २०२२ ते २०२५ या कालावधीत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये दाखल गुन्ह्यांची माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन नेलेकर यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळवली. त्यात या चार वर्षांत पुणे शहरात २६, तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत १९ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई शहरात फक्त एक गुन्हा दाखल झाला असून, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी बोलकी असून, डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारीसुद्धा आहे.

अशोक खरात प्रकरणासारखीच एक घटना पुणे शहरात ३० वर्षांपूर्वी घडली होती. नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरात एका भोंदूने अनेक महिलांची फसवणूक केली होती. त्यांच्यावर अत्याचारही केले होते. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय टेमघरे यांनी या प्रकरणाचा छडा लावला होता. भोंदूला अटक करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती उजेडात आली होती. कौमार्य चाचणी करण्याची घटना वा उकळत्या तेलातून नाणे काढण्याचे प्रकारही काही वर्षांपूर्वी पुण्यात घडले होते. गेल्या वर्षी झालेल्या एका आंदोलनाचा तपास करताना, एका मंदिरातील कथित गुरूने विशिष्ट प्रकारे आंदोलन करण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी या प्रकरणात या गुरूसह आंदोलकांना अटक केली होती.

कामाच्या व्यापात, व्यावसायिक समस्यांच्या गर्तेत असलेला प्रत्येक जण मन:शांती मिळविण्यासाठी धडपडतो. मात्र, पुण्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षांपासून गल्लोगल्ली कथित बाबा, गुरूंनी ठाण मांडल्याचे दिसते. दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करणारे हे भोेंदू समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांची राजरोसपणे फसवणूक करतात. नागरिकांनीच आता अशा भोंदूंपासून सावध राहणे गरजेचे आहे.

rahul.khaladkar@expressindia.com