पुणे : जिद्द आणि शिकण्याची इच्छाशक्ती असल्यावर यशाचा मार्ग सापडतोच, हे शहरातील दोन विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. अंधत्व असल्याने लेखनिकाची मदत घेण्याचा पर्याय असतानाही सनथ देशपांडे आणि शौर्य गवळी या दोन विद्यार्थ्यांनी स्वत: संगणकावर टायपिंग शिकून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आत्मनिर्भरतेचे उदाहरण घालून दिले. सनथने ९१ टक्के, तर शौर्यने ७३.८ टक्के गुण मिळवले.

राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. विद्यार्थ्याची स्वत:ची हुशारी, समज असली, तरी लेखनिकाचा वेग, त्याची विषयाची समज आणि शब्दांची मांडणी यावर विद्यार्थ्याचे भवितव्य अवलंबून असते. तसेच अलीकडे लेखनिक उपलब्ध होण्यातही मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर निवांत अंध मुक्त विकासालयाच्या उमा बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनथ आणि शौर्य यांनी संगणक टायपिंग शिकून घेतले.

उमा बडवे यांनी स्वलेखन टायपिंग ट्यूटर सॉफ्टवेअर ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आता दृष्टीहीन विद्यार्थ्यांना स्वत: टायपिंग करून परीक्षा देणे शक्य झाले आहे. दहावीच्या परीक्षेत सनथ देशपांडे आणि शौर्य गवळी या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने स्वत:चे भविष्य लिहिण्याचे ठरवले. स्वलेखन टायपिंग ट्यूटर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने टायपिंग शिकून परीक्षेतही स्वत: उत्तरे टाइप केली.

शौर्य गवळी हा भोसरीतील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. ‘पाचवीपासूनच टायपिंग शिकण्यास सुरुवात केली. वडील टाटा मोटर्समध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. तर आई फॅशन डिझायनर आहे. भविष्यात वकील होऊन इतिहासात पीएच.डी. करण्याची इच्छा आहे. तसेच, कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा माझा मानस आहे,’ असे शौर्यने सांगितले.

सनथ देशपांडे या विद्यार्थ्याने कोथरूडमधील कर्वे शिक्षण संस्थेच्या एरंडवणा माध्यमिक विद्यालयातून परीक्षा दिली. त्याची आई सनदी लेखापाल, तर वडील स्थापत्य अभियंता आहेत. सनथ म्हणाला, ‘इयत्ता आठवीपासून टायपिंग शिकण्यास सुरुवात केली. सातत्याने सराव केल्यामुळे चांगल्या वेगाने टायपिंग करणे शक्य झाले. आता मला मानसशास्त्र, संगीत क्षेत्रात करिअर करायचे आहे.’