पुण्यामध्ये गेल्या महिन्यापासून आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अशातच खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त संकलनात घट आल्याने शहरात रक्ताची टंचाई भासत असल्याची माहिती खाजगी रक्तपेढ्यांनी दिली आहे.नेहमी ऑक्टोबर महिना आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या तसेच दिवाळीचा कालखंड या काळात मोठ्या प्रमाणावर शहरात रक्त टंचाई होत असते. ही संभाव्य रक्त टंचाई लक्षात घेता अनेक स्वयंसेवी संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. मात्र यंदा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात रक्तटंचाई निर्माण झाली असून खाजगी रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढ्यांमध्ये साठा खाली आला आहे. अशातच शहरात डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे प्लेटलेट्सची मागणी वाढली असून, आवश्यक रक्ताचा पुरवठा जवळपास अर्ध्यावर आला आहे.

सध्या पुणे शहर व जिल्ह्यात ५३ नोंदणीकृत रक्तपेढ्या आहेत. संपूर्ण शहरात दररोज सुमारे १५०० ते १६०० रक्तपिशव्यांची गरज असते. मात्र, सध्या प्रत्यक्ष संकलन अवघे ८०० पिशव्यांच्या आसपास होत आहे. नियमित रक्ताच्या मागणीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, डेंगीच्या एका रुग्णाला त्याच्या वैद्यकीय गरजेनुसार ४ ते १० प्लेटलेट्सच्या पिशव्या लागू शकतात. शहरात दररोज २०० ते ३०० प्लेटलेट्स पिशव्यांची गरज भासत आहे.

थॅलेसेमिया ग्रस्तांना अधिक रक्त लागत असून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी नियमितपणे रक्तसंक्रमण करावे लागते, तर अपघात आणि शस्त्रक्रियेच्या रुग्णांसाठीही रक्ताची उपलब्धता अनिवार्य असते. प्लेटलेट्सची गुणवत्ता आणि आयुष्य हे केवळ पाच दिवसांचेच असल्यामुळे त्याचा मोठा साठा आगाऊ करून ठेवता येत नाही. तसेच रक्त हे प्रयोगशाळेत तयार करता येत नसल्याने केवळ निरोगी मानवी रक्तदान हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

रक्तदानाबाबत जनजागृती कमी पडत असल्याने आणि शिबिरांचे नियोजन घटल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना प्लेटलेट्स व रक्तासाठी भटकंती करावी लागत आहे.

खाजगी रक्तपेढ्यांमधील तुटवडा मोठ्या प्रमाणावर असून तो भरून काढण्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे अशी अपेक्षा रक्ताचे नाते या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक राम बांगड यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे जेव्हा समाजाला रक्ताच्या टंचाईला सामोरे जावे लागते अशावेळी गणेशोत्सव मंडळ आणि कार्यकर्ते कायम तत्पर असतात. किंबहुना शहरातील रक्तदानात मंडळ आणि कार्यकर्त्यांचा वाटा सिंहाचा असतो अशी माहिती साईनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी दिली.