पुणे : शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक खासगी रक्तपेढ्यांमधील साठा थेट निम्म्यावर आला आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ही परिस्थिती समोर आल्यानंतर पुण्यातील गणेश मंडळे रक्तसंकलनासाठी सरसावली आहेत. या आठवडाभरात शहराच्या कानाकोपऱ्यात लहान-मोठ्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, रक्तदान चळवळीत कार्य करणारे कार्यकर्ते औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सहकार्याने या मोहिमेतून दीड ते दोन हजार रक्ताच्या पिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट गणेश मंडळांनी ठेवले आहे.

दर वर्षी उन्हाळा आणि दिवाळीच्या तोंडावर शहरात रक्ताचा साठा घटतो. या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरात विविध शिबिरे होतात. यंदा मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणेकरांना रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. अशातच डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. प्लेटलेटची समस्याही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. थॅलेसेमिया रुग्णांसाठी आणि अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणावर निकड असते. या पार्श्वभूमीवर रक्तसंकलनासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध मंडळांच्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार पिशव्यांचे संकलन होणार असून, हे संकलित रक्त ससून रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, जनकल्याण रक्तपेढी यांसह इतर ठिकाणी देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाने सोमवारी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. या माध्यमातून जवळपास २७६ पिशव्यांचे संकलन झाले. जनकल्याण पेढीला हे रक्त देण्यात आले असून, मंडळाच्या वतीने दर वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येण्यात येते. गणेशोत्सवाचा हेतूच समाजाने संघटित व्हावे आणि एकमेकांना सहकार्य करावे, असा असून, रक्तदानाच्या माध्यमातून याचा श्री गणेशा करण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली. याशिवाय कसबा पेठ येथील चंद्रशेखर आजाद मंडळ, वंदे मातरम मित्र मंडळ यांचीही या आठवड्यात रक्तदान शिबिरे होणार आहेत.

केवळ शहरातच नाही तर उपनगरांमध्येही रक्तदान शिबिरे होणार असून, धानोरीतील सोसायटीमध्ये गुरुवारी रक्तदान शिबिर होणार आहे. या माध्यमातून जवळपास शंभर पिशव्यांचे संकलन होणार आहे, अशी माहिती गणपती मंडळांच्या सूत्रांनी दिली.

औद्योगिक क्षेत्राचाही हात

गणपती मंडळांबरोबरच औद्योगिक कंपन्यांमध्येही रक्तदान शिबिरे होत असून, भोसरीतील ‘फोरोशा प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमध्ये मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण जिल्हा रुग्णालयातही रक्ताचा तुटवडा असून, या शिबिरातील संकलित पिशव्या ‘वायसीएम’ रुग्णालयाला देण्यात येणार आहेत, अशी माहिती कंपनीचे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र निखळ यांनी दिली.

प्लेटलेट्ससाठीही रक्तदान शिबिर

शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया रुग्ण वाढत असून, प्लेटलेट्सची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी रक्तदान शिबिरातील जुने कार्यकर्ते सदाशिव कुंदेल यांच्या पुढाकाराने मंगळवारी धनकवडी भागात नाभिक सेवा संघाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून १०० पिशव्यांचे संकलन झाले असून, यातील प्लेटलेट्स डेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांना उपयोगी ठरणार असल्याची माहिती कुंदेल यांनी दिली.

औंध जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताचा कुठलाही तुटवडा नाही. महिन्याला जवळपास २०० पिशव्या लागतात. सध्या १८० पिशव्या असून, लवकरच शिबिरांच्या माध्यमातून यामध्ये अधिकची भर पडणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला कुठल्याही प्रकारची टंचाई भासणार नाही. – डॉ. निशा तेली क्षीरसागर, औंध जिल्हा रुग्णालय

पुण्यात शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्था खूप आहेत. प्रत्येक संस्थेने त्यांच्या माध्यमातून वर्षात दोन रक्तदान शिबिरे घेतली, तरी पुण्यात तरी रक्ताचा तुटवडा होणार नाही. रक्तकेंद्रांनी त्यांना धर्मादाय आयुक्तांकडून मिळालेल्या नियमांचे पालन करणे व रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य मदत आणि मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.-राम बांगड, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट

शहरामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली असून, येत्या आठवड्याभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जवळपास २०० पिशव्या संकलित करण्यात येणार आहे. या पिशव्या ससून रुग्णालयातील थॅलसेमिया रुग्णांसाठी देण्यात येणार आहेत. –स्वप्नील दळवी, अध्यक्ष, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ