पुणेः शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी परगावी गेलेला मोठा वर्ग, रक्तदान शिबिरांची घटलेली संख्या यामुळे गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भेडसावत आहे. मे महिन्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दर वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात रक्तसंकलन कमी होत असते. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा आणि त्यानंतर उन्हाळी सुट्ट्यांचा काळ, परगावी गेलेला मोठा वर्ग यामुळे शहरांमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या जेमतेम असते. या महिन्यांचा विचार केला, तर यंदा शहरात आतापर्यंत केवळ दोन ते तीनच मोठी शिबिरे झाली. शहराची गरज लक्षात घेता हा आकडा अगदीच तुटपुंजा आहे.
पुणे शहराला दररोज अंदाजे १५०० रक्ताच्या पिशव्या लागतात. मात्र जेमतेम ७०० ते ८०० पिशव्यांची उपलब्धता असते. अशा वेळी नातेवाईकांना रक्त पेढ्यांमध्ये रक्त मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. मे महिन्यात कडक उन्हाळा आणि सुट्ट्यांचा काळ यामुळे ही टंचाई अधिक गडद होऊ शकते. त्यातही गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणारे सिंगल डोनर प्लेटलेटस मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नोंदणीनुसार राज्यात ३७३ रक्पपेढ्या असून पुणे शहरात ४२ सार्वजनिक आणि खासगी रक्तपेढ्या आहेत.
रक्ताचे नाते या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक राम बांगड यांनी रक्तदात्यांनी केवळ शासकीय रुग्णालयाशी संलग्न असलेल्या रक्तदान शिबिरातच अथवा रक्तदान पेढीतच रक्तदान करावे. असे आवाहन केले.
उन्हाळा, शाळा, महाविद्यालयांना असणाऱ्या सुट्ट्या, शिबिरांची रोडावलेली संख्या यामुळे रक्ताचा साठा खाली येतो. याशिवाय, नियोजित शस्त्रक्रिया, कर्करोग थॅलेसेमिया या रुग्णांना लागणारे रक्त यामुळेही आवश्यक साठा असावा लागतो. आपल्याकडे २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या काळात मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरे होतात. रक्तदान केल्यानंतर दात्याला तीन महिने रक्तदान करता येत नाही. या चढ-उतारामुळे ठरावीक काळात योग्य पुरवठा आणि ठरावीक काळात रोडावलेली संख्या असे चित्र होते.-आनंद चाफेकर, प्रमुख, केईएम हॉस्पिटल रक्तपेढी
रक्त संकलन कमीच
राज्य रक्त संक्रमण परिषद दर वर्षी आकडेवारी जाहीर करते. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात २१२७ शिबिरे झाली. त्यातून त्यातून २.५८ लाख पिशव्या इतके रक्त संकलन झाले. वास्तविक साडेतीन लाख पिशव्यांची गरज आहे.
औंध शासकीय रुग्णालयात पंधरा दिवसांचा साठा
औंध शासकीय रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर निशा तेली यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, की ‘निरंकारी मिशन संस्थे’ने दोन दिवसांपूर्वी केलेल्या रक्तदानामुळे रुग्णालयाला १०९ पिशव्या मिळाल्या. सध्या रुग्णालयात १३९ पिशव्या असून, केवळ पंधरा दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. यानंतर मे महिन्यात एका शिबिरातून जेमतेम ३० ते ४० पिशव्यांचेच संकलन होणार आहे त्यामुळे पुढील महिन्यात तीव्र टंचाई जाणवणार आहे.
