पुणे : ‘गावात ग्रंथालये नसतात. शेतकऱ्यांच्या पोरांना पुस्तके मिळत नाहीत. घरातल्या मोठ्या मुलाची पुस्तके लहान मुलाला दिली जातात. आता ग्रामीण भागातील साहित्य, पुस्तकांची चळवळ समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मोहोळ बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकूर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर या वेळी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहर हे साहित्य, कला, संस्कृती यांचे मानबिंदू आहे. पुणे पुस्तक महोत्सवात वाचकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. हा भारतीय विचारांचा आणि संस्कृतीचा कार्यक्रम झाला आहे. नागरिकांना वाचण्याची आवड निर्माण होत आहे. भविष्यात असे महोत्सव ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तेथे ग्रंथालये, वाचनालये निर्माण करावी लागतील.’
पाटील म्हणाले, ‘प्रत्येक भारतीय माणसाचा सहा तासांचा वेळ मोबाइलवर जात आहे, हे फार गंभीर आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत मुलांना मोबाइल न देण्याबाबत निर्णय झाला आहे. आता नागरिकांना वाचनाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
‘वाहतूक कोंडी सोडवणार’
‘मध्यंतरी एका प्राध्यापकाने समाज माध्यामांवरून पुण्याची वाहतूक कोंडी अनुभवा, असे आवाहन केले. आज, शनिवारी पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाहूतक कोंडीचा प्रत्यय आला. येत्या काही दिवसांत ही गर्दी वाढत जाणार आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि मी पुणे पोलिसांशी संवाद साधून वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पुण्यात पुस्तक महोत्सव कुणी सुरू केला ?
‘आधुनिक काळात गावाची ओळख त्या गावात काय घडतं, यावर अवलंबून असते. मुळा मुठेच्या किनारी हा ज्ञानयज्ञ थाटलेला आहे. अशा पद्धतीचा पुस्तक महोत्सव केवळ दिल्ली आणि कलकत्ता येथेच होतो. अवघ्या दोन वर्षात पुणे पुस्तक महोत्सवाने या दोन्ही महोत्सवाची बरोबरी केली आहे. त्यामुळे पुढील काळात पुण्यात एवढा भव्य पुस्तक महोत्सव कुणी सुरू केला, असा प्रश्न आला की, नागरिक राजेश पांडे, मिलिंद मराठे या आयोजकांचे नाव घेतील,’ असे गौरवोद्गार विश्वास पाटील यांनी काढले.
