पुणे : एका नऊ वर्षांच्या मुलाला लहानपणी हायपर आयजीई सिंड्रोम हा दुर्मीळ विकार जडला. त्यानंतर त्याला रक्ताच्या कर्करोगाची बाधा झाली. त्याची प्रकृती अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीची बनली. डॉक्टरांनी या मुलावर प्रगत उपचार आणि विशेष अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) केले. त्यामुळे अखेर त्याने या दोन्ही आजारांवर मात केली आहे.
या मुलाला लहानपणीच ‘हायपर आयजीई सिंड्रोम’ हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले होते. हा एक प्राथमिक रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विकार असून, तो शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमकुवत करतो. या आजारावर उपचार सुरू असतानाच या मुलाला ‘बुर्किट लिम्फोमा’ या वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ‘सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले.
रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी असलेल्या या मुलाच्या कर्करोगावर उपचार करण्याचे डॉक्टरांसमोर आव्हान होते. कारण, केमोथेरपीमुळे प्रतिकारशक्ती आणखी कमी होते आणि जीवघेण्या संसर्गाचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ, कर्करोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया पथकाने काळजीपूर्वक उपचार नियोजन केले.
या मुलाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून केमोथेरपीची तीन चक्रे पूर्ण करण्यात आली. या काळात गंभीर संसर्गामुळे त्याला अनेक वेळा अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. तसेच, श्वसनासाठी कृत्रिम आधाराची गरज पडली. मुलाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांनी ‘हॅप्लोआयडेंटिकल’ ही अस्थिमज्जा प्रत्यारोपण प्रक्रिया पार पाडली. त्यामध्ये मुलाचे वडील दाता होते. या प्रत्यारोपणात गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी प्रगत ‘अल्फा-बीटा टी-सेल रिसेप्टर डिप्लिशन’ आणि ‘इम्युन-सेल प्रोसेसिंग’ तंत्राचा वापर करण्यात आला. प्रत्यारोपणानंतर मुलाला फुफ्फुस आणि पित्तनलिकेचा संसर्ग झाला. त्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता हा मुलगा पूर्णपणे बरा झाला आहे. त्याची रोगप्रतिकारक शक्ती आता सामान्य झाली असून, तो कर्करोगमुक्त आहे.
या मुलाला एकाच वेळी दोन दुर्मीळ आजार होते. आम्हाला प्रत्येक टप्प्यावर कर्करोगाचे उपचार आणि संसर्ग नियंत्रण यांचा समतोल राखावा लागला. ‘हॅप्लोआयडेंटिकल टीसीआर-डिप्लेटेड ट्रान्सप्लांट’ प्रक्रियेद्वारे त्याच्यावर उपचार करण्यात आले. – डॉ. संदीप बारटक्के, कर्करोगतज्ज्ञ
