पुणे: आईची जबाबदारी सांभाळण्यासाठी आयुष्यभर विवाह न करण्याचा निर्णय घेतलेल्या दौंड येथील ४० वर्षीय विमा प्रतिनिधी महिलेने मृत्यूनंतरही मानवतेचा आदर्श जपला. रस्ते अपघातात मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि फुफ्फुसांच्या दानातून चार गंभीर रुग्णांना नवजीवन मिळाले.
रस्ते अपघातानंतर संबंधित महिलेला ७ जुलै रोजी उपचारांसाठी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान ९ जुलै रोजी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन स्वतःच्या दुःखाचे रूपांतर इतरांसाठी आशेच्या किरणात केले.
१० जुलै रोजी अवयव काढण्याची (ऑर्गन रिट्रिव्हल) शस्त्रक्रिया करण्यात आली. नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे यांनी सांगितले, की दात्याचे फुफ्फुसे, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे काढण्यात आली. त्यापैकी यकृत आणि एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नोबल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड आणि फुफ्फुसे झेडटीसीसीच्या माध्यमातून ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील अन्य रुग्णालयात पाठविण्यात आली. यकृताच्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेल्या ५९ वर्षीय पुरुषावर यकृत प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले. तसेच, मूत्रपिंड निकामी झालेल्या ४९ वर्षीय महिलेवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मनोज श्रीवास्तव आणि डॉ. स्मिता पारख, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. विक्रम सातव, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व प्रत्यारोपण समन्वयक महेश तुपे तसेच संपूर्ण प्रत्यारोपण पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले, ‘अत्यंत दुःखाच्या क्षणीही दात्याच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या असामान्य उदारतेला आम्ही मनःपूर्वक सलाम करतो. तसेच, ही जीवनदायी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या झेडटीसीसी पुणे, ग्रीन कॉरिडॉर उभारणाऱ्या वाहतूक पोलिसांचे आणि सर्व आरोग्यसेवा पथकांचे आम्ही मनापासून आभार मानतो.’
मुलीच्या मृत्यूचा धक्का पचविणे अवघड
या महिलेचे संपूर्ण आयुष्य निःस्वार्थीपणा आणि कर्तव्यदक्ष असलेल्या समर्पणाचे उदाहरण ठरले. दोन्ही मोठ्या बहिणींचे विवाह झाल्यानंतर वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आईची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा धक्का त्यांच्या आईंना पचविणे खूप जड गेले. मुलीच्या निधनानंतरही अवयवदानाच्या माध्यमातून ती जिवंत राहिली. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांचे, यकृताचे आणि फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करून चार जणांना नवजीवन मिळाले. मृत्यूनंतरही अवयवदानाच्या माध्यमातून एक व्यक्ती अनेकांना जीवनदान देऊ शकते आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण करू शकते.
