पुणे : आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर चौक या दरम्यानचा ‘जलद वाहतूक सेवा ‘ (बीआरटी) मार्ग काढून टाकून हा रस्ता खासगी वाहनांना खुला करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला. त्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. गुरुवारी हा बीआरटी मार्ग आणि त्यावरील बस स्थानके काढण्यास सुरुवात झाली.

या रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढावा तसेच येथील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळावा, यासाठी हा बीआरटी मार्ग काढून टाकण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पुढील आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल होत आहे. विश्रांतवाडी ते फुलेनगर या रस्त्यावर असलेल्या बीआरटी मार्गाचा फारसा उपयोग वाहनचालकांना होत नाही. तसेच पुणे शहरात येणाऱ्या पालखी सोहळ्याला देखील या बीआरटी मार्गाची अडचणच होत आहे. त्यामुळे हा मार्ग काढून टाकण्यात यावा, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.

फुलेनगर ते विश्रांतवाडी रस्त्यावर असलेल्या बीआरटी मार्गामुळे कमी वेळेत बस जातात. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. त्यामुळे हा बीआरटी मार्ग काढून टाकू नये, असा अभिप्राय देत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) त्याला विरोध केला होता. मात्र पोलिसांच्या वाहतूक शाखेने आणि महापालिका प्रशासनाने बीआरटी मार्ग काढण्यास अनुकूलता दर्शविल्याने स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत पाठवण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पुणे शहरात दाखल होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी हा बीआरटी मार्ग अडथळा ठरत असल्याने पालखी सोहळा शहरात दाखल होण्यापूर्वी हा मार्ग काढून टाकावा अशी मागणी सभागृहात करण्यात आली. त्याला देखील मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता बीआरटी मार्ग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी या बीआरटी मार्गावरील बस स्टॉप काढण्यास सुरुवात करण्यात आली.

केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असताना पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बीआरटी प्रकल्प सुरू करण्यात आला. सातारा रस्ता, नगर रस्ता, हडपसर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर टप्प्याटप्प्याने बीआरटी सेवा सुरु झाली. आळंदी रस्त्यावरील संगमवाडी ते विश्रांतवाडी असा बीआरटी मार्ग सुमारे १३ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला. हा मार्ग सक्षमपणे चालवा यासाठी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यात आली. त्यावेळी स्वारगेट ते विश्रांतवाडी हे सुमारे १२ किलोमीटरचे अंतर केवळ १५ मिनिटांत पार केले जात होते. यासाठी या रस्त्यावर तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.

या बीआरटी मार्गाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. गेल्या काही वर्षात स्वारगेट ते शिवाजीनगर या दरम्यान कोंडी वाढल्याने बीआरटीच्या प्रवासाचा वेळ वाढला, पण संगमवाडीपासून ते विश्रांतवाडीपर्यंत बीआरटी हा उत्तम पर्याय होता. मात्र बीआरटी मार्गामुळे वाहतुकीचा वेग कमी होत असल्याचा अभिप्राय पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिला. महापालिका प्रशासन देखील हीच भूमिका स्वीकारल्याने बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका आणि पोलिसांनी उद्देशालाच फसला हरताळ

फुलेनगर ते विश्रांतवाडी या रस्त्यावरील संगमवाडी, बिंदूमाधव ठाकरे चौक, बॉम्बे सॅपर्स चौक येथे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे अनेक खासगी वाहने बीआरटी मार्गात घुसतात. खासगी वाहने गर्दीत अडकून पडलेली असताना बीआरटीतून जाणारी बस ही वेगात पुढे निघून जाते. यामुळे अनेक प्रवासी या मार्गावरून जाणाऱ्या बीआरटीकडे आकर्षित होत होते. हा बीआरटी मार्गाचा उद्देश आहे. मात्र, त्यावर हरकत घेत बीआरटी मार्गामुळे अपघात वाढत आहेत. वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचा दावा करत महापालिका व वाहतूक पोलिसांनी आळंदी रस्त्यावरील बीआरटी काढून टाकण्यास पाठिंबा दिला आहे.