पुणे : मेफेड्रोन बाळगणाऱ्या मुंबईतील एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्या वेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची मााहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, तसेच पाच हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मेफेड्राेनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने मेफेड्रोन कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैन याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मेफेड्रोनची विक्री केल्याप्रकरणी एका कुंटणखाना मालकिणीसह तिच्या भावाला अमली पदाार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. कुंटणखाना मालकीण आणि तिचा भाऊ हे वेश्यावस्तीत येणाऱ्या ग्राहकांना, तसेच महिलांना मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली होती.