Pune Police raid Budhwar Peth red light area बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत (रेड लाईट) पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. या कारवाईत पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पाच महिलांविरुद्ध बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात खडक पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह १५ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री वेश्यावस्तीत शोधमोहीम राबवून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले’, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. त्या स्वेच्छेने देहविक्रय करत असल्याची माहिती मिळाली आहे. महिला बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सुनील मोरे, महेश राठोड, गजानन सोनुने, वसीम शेख, रवींद्र बत्तीशे, राणी शिंदे, पूुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे, करिष्मा कडाळे यांनी ही कारवाई केली.
दोन वर्षात १३० बांगलादेशी मायदेशी
शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षात १३० बांगलादेशींची मायदेशी (डिपोर्ट) करण्यात आले आहे. बुधवार पेठेतून ताब्यात घेण्यात आलेल्या ५२ महिलांना बांगलादेशात पाठविण्यात आले आहे.
