पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी महिलांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. बेकायदा बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) राबविली आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिला वास्तव्य करत असल्याची माहिती फरासखाना, खडक पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वेश्यावस्तीतील सागर बिल्डींग या इमारतीत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत बांगलादेशी महिला बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली.

ब्युटीपार्लर, शिवणकामाचे आमिष

पोलिसांनी बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत दलालांनी त्यांना भारतात ब्युटी पार्लर, शिवणकाम, तसेच घरकाम मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणल्याचे उघडकीस आले. दलालांनी आमिष दाखवून त्यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आणले. त्यांना धमकावून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. बांगलादेशी महिलांनी भारतीय सीमा कशी पार केली, बेकायदा वास्तव्य करताना कागदपत्रे कशी मिळवली ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

वर्षभरात १०३ बांगलादेशी नागरिक ताब्यात

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबविली. वर्षभरापूर्वी रावले यांनी परिमंडळ एकच्या उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. ’वर्षभरात मध्य भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १०३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी अनेकांची मायदेशी रवानगी (डिपोर्ट) करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली’, अशी माहिती उपायुक्त रावले यांनी दिली.