पुणे : लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे एका बांधकाम व्यावसायिकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत एका बांधकाम व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाच्या घरी दूरध्वनीवर अज्ञाताने संपर्क साधला. लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील टायसन बिष्णोईच्या नावे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.
त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या मुलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पुन्हा खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ‘खंडणी न दिल्यास कुटुंबातील सदस्यावर गोळीबार करून जिवे मारू. त्यानंतर खंडणीची रक्कम वाढेल. पाच कोटींऐवजी १० ते १५ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. खंडणीसाठी सातत्याने धमक्या येत असल्याने अखेर घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेत धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई याच्या नावे एका पोलाद व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागण्यात आली. खंडणी मागितल्यानंतर पोलाद व्यवासायिकाच्या हडपसर-सासवड रस्त्यावरील गोदामासमोर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी गुन्हे शाखेने राजस्थानातून चौघांना अटक केली होती.
बिष्णोई टोळीच्या नावे एका औषध वितरकाला धमकाविण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात असलेल्या एका फर्निचर व्यावसायिकाच्या दालनासमोर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली होती. बिष्णोई टोळीच्या नावे गेल्या दोन ते तीन महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकाविण्याचे प्रकार वाढले आहेत.
