पुणे : इमारतींची तपासणी, दोषांचे निदान आणि देखभाल यामध्ये आता कृत्रिम प्रज्ञाधारित प्रणालीचा वापर होणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानासह ४० हजारांहून अधिक इमारतींच्या तपासणीतून हाती आलेल्या विदेचा वापर करून इमारतींचे निदान अधिक अचूक, सुलभ, परवडणारे आणि व्यावहारिक करणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या माध्यमातून इमारतींची तपासणी करण्यासाठी पुण्यात इमारत निदान अनुभव केंद्र सुरू करण्यात आले आहे.
‘गृह संजीवन फाउंडेशन’ आणि ‘फॉक्सस्कॅन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अनुभव केंद्रामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इमारतींमधील समस्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे आणि अधिक माहितीपूर्ण देखभाल निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. भारतीय बांधकाम आणि इमारत देखभालीच्या परिस्थितीला अनुरूप निदान साधनांची गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे निदान प्रारूप ४० हजारांहून अधिक इमारतींच्या तपासणीतून संकलित केलेल्या विदेच्या आधारे विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘फॉक्सस्कॅन’चे संस्थापक आणि मुख्याधिकारी अभिषेक जगदाळे यांनी दिली.
‘सामान्य उष्णता प्रतिमांकन प्रणाली प्रामुख्याने तापमानातील फरक ओळखतात. त्यापेक्षा व्यापक स्वरुपात तपासणी, विश्लेषण आणि निदान एका संरचित प्रक्रियेत आणण्यासाठी ही इमारत निदान ‘एआय’ प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीमुळे इमारतींमधील ओलावा, आर्द्रता आणि पृष्ठभागाची झीज यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढण्यापूर्वी ओळखणे शक्य होणार आहे. त्यामुळे दुरुस्ती, रंगकाम किंवा अंतर्गत सजावटीपूर्वी समस्यांचे मूल्यांकन करता येऊ शकते आणि अनावश्यक दुरुस्ती, वारंवार हस्तक्षेप, साहित्याचा अपव्यय कमी करण्यास मदत होऊ शकते,’ असेही जगदाळे यांनी स्पष्ट केले.
इमारत निदान ‘एआय’ प्रणाली
- उच्च दर्जाचे प्रतिमांकन
- पृष्ठभागाचे मोजमाप करण्यासाठी एकात्मिक लेझर प्रणाली
- कृत्रिम प्रज्ञा आणि मशिन लर्निंगवर आधारित दोष विश्लेषण
- मजबुतीकरण क्षमता परीक्षण
- स्वयंचलित निदान अहवाल
- संभाव्य उपाययोजना व दुरुस्तीसाठी शिफारशी
प्रगत इमारत निदान तज्ज्ञांपुरते मर्यादित न राहता कंत्राटदार, रंगकाम करणारे कारागीर, अभियंते आणि गृहनिर्माण संस्थांसाठी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. व्यावसायिकांचे कौशल्य वाढवून त्यांच्या उपजीविकेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, इमारतीची दुरुस्ती चुकीची होऊ नये, अनावश्यक साहित्याचा वापर कमी व्हावा आणि इमारत देखभालीला प्रतिक्रियात्मक दुरुस्तीपासून प्रतिबंधात्मक देखभालीकडे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. – मिलिंद जगताप, अध्यक्ष, गृह संजीवन फाउंडेशन
