पुणे : सोने, चांदीच्या वाढलेल्या किमती आणि जागतिक स्तरावरील अनिश्चिततेचा फटका यंदा स्थानिक पातळीवर अधिक मासानिमित्त आयोजित कार्यक्रमांनाही बसला आहे. एरव्ही, या काळात सराफी बाजारात गर्दी करणाऱ्या ग्राहकवर्गाने या दुकानांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलगी आणि जावयाला भेटवस्तू देण्याची परंपराही या महिन्यात पाळली जाते. त्यामुळे सराफी बाजारात या काळात गर्दी होते. सोने-चांदीचे दिवे, पैंजण, जोडवी, निरंजन, ताट तसेच ११ ते ३३ दिव्यांच्या आकर्षक संचांना ग्राहकांकडून मागणी असते. याशिवाय, तांबे व इतर धातूंमधील पर्यायही उपलब्ध करून देण्यात येतात. या वस्तूंची किंमत हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत असते. ग्राहक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खरेदी करतात.

यंदा मात्र सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठल्याने अधिक मासातील खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. सोने तोळ्यामागे दीड लाखांपुढे, तर चांदी किलोमागे अडीच लाखांच्या घरात पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे दरपत्रक कोलमडले. त्यातच इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्चाचा ताणही वाढला आहे. परिणामी, अनेकांनी यंदा खरेदीबाबत हात आखडता घेतल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या अधिक मासाच्या तुलनेत भेटवस्तूंच्या किमती चार ते पाच पटींनी वाढल्याने ग्राहकांमध्ये अपेक्षित उत्साह दिसत नसल्याचे व्यापारी वर्तुळातून सांगण्यात आले.

आता प्रतीक्षा गणेशोत्सवाची

पुणे सराफी बाजारपेठ ही देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोडते. एकट्या पुण्याचा विचार केला, तर २५ हजार ते ३० हजार कारागिरांचा रोजगार सराफी बाजारपेठेवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या विक्रमी वाढीमुळे बाजारपेठेतील उलाढाल थंडावल्याचे बाजारपेठेतील जाणकारांनी सांगितले. तसेच, बहुतांश कारागीर पश्चिम बंगालचे असून, निवडणुकांच्या काळात कारागिरांचा हा वर्ग आपल्या गावी गेला, जो अद्याप परतलेला नाही. मोठ्या प्रमाणावर भाववाढ झाल्याने मागणी फारशी नाही. त्याचा परिणाम कारागिरांवरही झाला आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात कारागीर मोठ्या संख्येने पुन्हा शहरात येतील अन् हे चित्र पालटेल, असा आशावाद सराफी वर्तुळातून व्यक्त करण्यात आला.


भाववाढ झाल्याने ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला. पूर्वी आधिक मासात भेट दिल्या जाणाऱ्या चांदीच्या ताटाची किंमत एक लाख रुपये होती, ती आता चार लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे हलक्या वजनाच्या, छोट्या वस्तू नागरिक घेत आहेत. मात्र, किमती नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कारागिरांवरही याचा परिणाम झाला आहे. – अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पी. एन. गाडगीळ अँड सन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्राहकांना सोने-चांदी खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावर जे वातावरण आहे, त्यामुळे ग्राहकांचा रेटा तुलनेने कमी आहे. ग्राहक पूर्वी सढळ हाताने खरेदी करत होते, तसे आता चित्र नाही. त्यामुळे विक्रीसाठी पाचशे रुपयांपासूनच्या चांदीच्या भेटवस्तू बाजारात आहेत. – शैलेश रांका, रांका ज्वेलर्स


यंदाच्या अधिक महिन्यात ग्राहकांचा फारसा उत्साह नाही. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक परिस्थिती कारणीभूत असली, तरी यंदा सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह असला, तरी किमती परवडणाऱ्या नाहीत. कारागिरांवरही परिणाम झाला असून, सराफी बाजारपेठांमध्ये फारसे आशादायी चित्र नाही. – कुणाल अष्टेकर, अष्टेकर ज्वेलर्स