पुणे : शहरात घरफोड्यांच्या घटना सुरूच असून, मुंढवा भागात बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वाचार लाखांच्या ऐवजाची चोरी केली. तर, कर्वे रस्ता परिसरात चोरट्यांनी एक दुकान फोडून गल्ल्यातील २५ हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने मुंढवा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ जून ते २ जुलै या कालावधीत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंढवा येथील पिंगळे वस्ती परिसरातील लक्ष्मी पार्क सोसायटीत राहण्यास आहेत. कुटुंबीयांसमवेत काही कामानिमित्त ते परगावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. घरामधील शयनगृहातील कपाटातून १ लाख ९५ हजारांची रोकड, दागिने आणि हिरे असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरला. दुसऱ्या घटनेत कर्वे रस्त्यावरील लुनावत कॉम्प्लेक्समधील एक बंद दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातून २५ हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.