scorecardresearch

पीएमपीच्या गाडय़ांची संख्या वाढण्यासाठी पुणे बस यात्रा उपक्रम

एक लाख प्रवाशांमागे पीएमपीच्या पन्नास गाडय़ा असाव्यात, अशी मागणी पुणे बस यात्रा या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली.

एक लाख प्रवाशांमागे पन्नास गाडय़ांची मागणी

पुणे : एक लाख प्रवाशांमागे पीएमपीच्या पन्नास गाडय़ा असाव्यात, अशी मागणी पुणे बस यात्रा या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. पीएमपीच्या ताफ्यातील गाडय़ांची संख्या वाढली, तर प्रवासी सेवेचा दर्जा सुधारेल आणि रस्त्यावरील खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राहील, असे या उपक्रमाद्वारे सांगण्यात आले. शहरातील ‘परिसर’ या संस्थेच्या वतीने पुणे बस यात्रा हा उपक्रम आंबेडकर उद्यान आणि जंगली महाराज रस्ता येथे राबविण्यात आला. पीएमपीचे प्रवासी, सेवा पुरवठादार, वाहतूक तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आले आणि त्यांनी ही मागणी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून बस सेवेवर आधारित सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सत्तर लाख लोकसंख्येला पीएमपीकडून सेवा दिली जात आहे. प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे पन्नास गाडय़ा असणे आवश्यक आहे. पीएमपीच्या ताफ्यात २ हजार १०० गाडय़ा असून त्यापैकी १ हजार ४०० गाडय़ा दैनंदिन संचलनात आहेत. त्यामुळे एक लाख लोकसंख्येसाठी पन्नास गाडय़ा ही मागणी पूर्ण करण्यासाठी ३ हजार ५०० गाडय़ांची आवश्यकता आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्या आरोह याने शालेय दिवसातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांसाठी बस किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही प्रवाशांनी पीएमपीच्या दैनंदिन प्रवासाच्या कथा सांगितल्या. अपुऱ्या पायाभूत सुविधा, वेळापत्रक, दैनंदिन अडथळे आणि त्यावरील उपायांची माहिती देण्यात आली. एक लाख लोकसंख्येमागे ५० गाडय़ा या प्रमाणे साडेतीन हजार गाडय़ा उपलब्ध करणे शक्य आहे, असे वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी सांगितले. पथनाटय़, बस रॅप, प्रदर्शने असे उपक्रमही या वेळी आयोजित करण्यात आले. आठशेहून अधिक प्रवाशांनी या मागणीला पाठिंबा दर्शवित स्वाक्षरी केली. प्रवासी एकत्र येऊन गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी करतील आणि राज्य सरकारकडून ही मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा परिसरचे कार्यक्रम संचालक रणजित गाडगीळ यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune bus yatra increase number pmp trains ysh

ताज्या बातम्या