पुणे : दीड कोटीच्या खंडणीसाठी गुलटेकडी परिसरातून एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यापाऱ्याचे अपहरण करुन पसार झालेल्या सराइतांना गुन्हे शाखेने अटक केली, तसेच व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करण्यात आली.

प्रणव बबन निवंगुणे (वय २३) शिरीष जितेद्र खोपडे (वय २६, रा. आंबेगाव पठार, धनकवडी), साहिल श्रीकांत खुटवड (वय २१, रा. भिलारेवाडी, कात्रज), सौरभ विश्वनाथ पवार (वय २७, रा. बा‌वधन खुर्द), मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यापाऱ्याच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी गुलटेकडीतील महर्षीनगर भागात राहायला आहे. २४ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी ते घरी जेवण करण्यासाठी यायचे. मात्र, दुपारी जेवण करण्यासाठी पती घरी आले नाहीत. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन आरोपींनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन महिलेच्या पतीने संपर्क साधला. ‘माझे अपहरण करण्यात आले आहे. माझ्या जिवाला धोका आहे. मला डांबून ठेवले आहे’, असे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी पत्नीकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर पतीची सुटका करतो, अशी धमकी दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्वरीत अपहरण प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिले. गुन्हे शाखेच्या पथकांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. आरोपींनी खंडणीची रक्कम मित्रमंडळ चौकात आणून देण्यास सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा लावून प्रणव निवंगुणे आणि साहिल खुटवड यांना पकडले. निवंगुणे, खुटवड यांचे साथीदार व्यापाऱ्याला घेऊन खेड शिवापूर परिसरात मोटारीतून गेल्याची माहिती मिळाली. खोपडे, पवार, दारवटकर यांना खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तावडीतून व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी सराईत असून, त्यांच्याविरुद्ध पुणे शहर, तसेच ग्रामीण पाेलिसांत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, प्रशांत अन्नछत्रे, अजित जाधव, सहायक निरीक्षक अमोल रसाळ आणि पथकाने ही कारवाई केली.