पुणे : पुण्यामध्ये सामान्य (नैसर्गिक) प्रसूतींच्या तुलनेत शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीची संख्या (सिझेरियन) गेल्या तीन वर्षांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. सामान्यतः बहुतांश गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबीयांची पसंती सामान्य प्रसूतीला असते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सिझेरियनच्या संख्येत वाढ होत आहे. उच्च जोखमीच्या गर्भधारणा, उशिरा होणारे मातृत्व, गर्भाच्या स्थितीतील गुंतागुंत आणि आई आणि बाळाची सुरक्षितता अशी कारणे असतील, तर सिझेरियन प्रसूतीला प्राधान्य दिले जाते.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये शहरात ३५ हजार ९५७ सामान्य आणि २३ हजार ८१७ सिझेरियन प्रसूती झाल्या. त्या वेळी सामान्य प्रसूतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त होते. मात्र २०२२-२३ पासून हे चित्र बदलू लागले. त्या वर्षी प्रथमच सिझेरियन प्रसूतींनी सामान्य प्रसूतींचा आकडा ओलांडला. त्यानंतर हा कल कायम राहिला. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २१ हजार ६३९ सामान्य प्रसूतींच्या तुलनेत २६ हजार ८५० सिझेरियन प्रसूतींची नोंद झाली आहे.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले, पूर्वीच्या तुलनेत उच्च जोखमीच्या गर्भधारणांचे प्रमाण वाढत आहे. गर्भाची चुकीची स्थिती, आधी झालेली सिझेरियन प्रसूती, प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतीची शक्यता आणि आई-बाळाची सुरक्षितता लक्षात घेऊन डॉक्टर आणि अनेक कुटुंबे सिझेरियन प्रसूतीचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे शहरातील प्रसूतीच्या पद्धतींत लक्षणीय बदल होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सिझेरियन ही जीव वाचविणारी शस्त्रक्रिया असली, तरी वैद्यकीय गरज असल्यासच ती करणे योग्य ठरते. सामान्य प्रसूतीमध्ये आई लवकर बरी होते, संसर्ग आणि रक्तस्रावाचा धोका तुलनेने कमी असतो, रुग्णालयात कमी दिवस राहावे लागतात आणि खर्चही कमी येतो. दुसरीकडे सिझेरियनमध्ये शस्त्रक्रियेनंतर वेदना, संसर्ग, जास्त खर्च आणि पुढील गर्भधारणांमध्ये काही अतिरिक्त धोके संभवू शकतात.
वर्ष…………..सामान्य प्रसूती…………..सिझेरियन प्रसूती
२०२१-२२…………..३५,९५७…………..२३,८१७
२०२२-२३…………..२८,००४…………..२९,१०३
२०२३-२४…………..२९,१०१…………..३४,६७२
एप्रिल २०२४ – फेब्रुवारी २०२५…………..२१,६३९…………..२६,८५०
सिझेरियन वाढण्यामागील प्रमुख कारणे
- उच्च जोखमीची गर्भधारणा
- गर्भाची चुकीची स्थिती
- पूर्वीची सिझेरियन प्रसूती
- प्रसूतीतील संभाव्य गुंतागुंत
- आई आणि बाळाच्या सुरक्षिततेला प्राधान्य
