पुणे : कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्याचा फटका पाणी नियोजनाला बसत असून, त्याचा परिणाम शहर आणि ग्रामीण भागातील पाणीवाटपाच्या नियोजनावर झाला आहे. एका बाजूला शहरावर १५ टक्के पाणीकपातीची टांगती तलवार असताना दुसऱ्या बाजूला जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात उन्हाळी आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पाण्याचे संकट तीव्र होण्याची शक्यता आहे.

यंदा ‘एल-निनो’चा प्रभाव जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सरासरी पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. जून महिनाही कोरडा जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला १५ टक्के पाणीकपात करण्याची सूचना केली आहे. मात्र, महापालिकेकडून कोणतीही पाणीकपात करण्यात आलेली नाही. मे अखेरपर्यंत पाणीकपात होणार नाही, असे महापौर मंजुषा नागपूरे यांनी जाहीर केले होते.

दर वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. या बैठकीत शहरासाठीच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पाणीवाटप केले जाते. यंदा नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांबरोबरच महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबणीवर पडली.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या अधिकारात जिल्ह्यातील शेतीसाठी उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १८ फेब्रुवारीपासून उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले असून, एकूण ९ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढे पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे. त्यापैकी आजमितीस सात टीएमसी पाणी उन्हाळी आवर्तनासाठी देण्यात आले आहे. हा निर्णय घेण्यात आला असताना पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाने निर्णय राखीव ठेवला आहे.

पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी ११ डिसेंबर ते १० फेब्रुवारीदरम्यान ६४ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यात ३.७७ टीएमसी इतका पाणीसाठा सोडण्यात आला होता. त्यानंतर शेतीसाठी दोन टप्प्यात पाणी सोडण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यात सहा टीएमसी पाणी हे १८ फेब्रुवारी ते २० एप्रिलदरम्यान साडण्याचे नियोजन होते. मात्र, मगरपट्टा परिसरातील कालवाफुटी आणि दुरुस्तीच्या कामामुळे एप्रिल अखेरपर्यंत पाणी सोडले. दुसऱ्या टप्प्यात १ ते ३१ मे या दरम्यान तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र, अद्यापही कालवा सुरूच आहे.

चार महिन्यांत दोन टीएमसी पाणीबचतीचे उद्दिष्ट

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रतिदिन १ हजार ५६० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेते. पुण्यात सध्या दररोज सुमारे १५६० दशलक्ष लिटर पाण्याचा वापर होत असून, तो दरमहा अंदाजे १.६५ टीएमसी आहे. कपातीनंतर हा वापर १२०० ते १३०० दशलक्ष लिटरपर्यंत मर्यादित ठेवणे अपेक्षित असून, मासिक वापर सुमारे १.३ टीएमसीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे. कपातीचा निर्णय झाल्यास दरमहा सुमारे ४५० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होऊन पुढील चार महिन्यांत दोन टीएमसी पाणीबचत होईल, असे सांगण्यात आले आहे.

अडीच लाख हेक्टर क्षेत्राला फायदा

या उन्हाळी आवर्तनाचा हवेली, दौंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीला फायदा होणार आहे. एकूण अडीच लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पाणी काटकसरीने वापरण्यासंदर्भात यापूर्वीच महापालिकेला कळविण्यात आले आहे. पाणीकपातीचा निर्णय हा सर्वस्वी महापालिकेचा आहे. या वेळी जुलैऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत धरणातील पाणी पुरवावे लागणार आहे. – किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग