पुणे : कटक मंडळाच्या हद्दीतील (कॅन्टोन्मेंट बोर्ड) प्रमुख रस्त्यांच्या साफसफाईची जबाबदारी आता पुणे महापालिका सांभाळणार आहे. ‘व्हीआयपीं’ची ये-जा असलेल्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. शहराबाबत चुकीची प्रतिमा तयार होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पुणे कटक मंडळाच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) हद्दीत विभागीय आयुक्तालयासह राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांची मध्यवर्ती कार्यालये आहेत. या परिसरात मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह अतिमहत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींची सतत ये-जा असते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून या भागातील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर, शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही चुकीची प्रतिमा तयार होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने या भागातील रस्त्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे कटक मंडळाचा परिसर हा तांत्रिकदृष्ट्या पुणे महापालिकेच्या हद्दीत येत नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या प्रमुख मान्यवर आणि नागरिकांना हा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत असल्या सारखे वाटते. या भागात सतत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असतो. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे पुणे महापालिकेच्या साफसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यामुळे महापालिकेच्या प्रतिमेला धक्का बसत होता.
या बाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कटक मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या कामासाठी महापालिकेला साधारणपणे २ कोटी रुपयांचा खर्च वर्षाला येणार आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने या भागातील प्रमुख मार्गांवर नियमित साफसफाई मोहीम राबवली जाणार आहे. पुणे कटक मंडळाची हद्द सुरू होते. त्या भागात विभागीय आयुक्तांचे कार्यालय, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, नवीन सर्किट हाऊस, जुने सर्किट हाऊस, बार्टी, यासह केंद्र तसेच राज्य सरकारच्या संबंधित विविध विभागाची कार्यालये आहेत. या भागात बैठका होत असतात. सतत महत्वाच्या व्यक्तींचा वावर या परिसरात असतो. रस्त्यांवर आवश्यक ती स्वच्छता होत नसल्याने त्याचे खापर महापालिकेवर फुटते.
अधिक माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर म्हणाले, पुणे कटक मंडळाच्या हद्दीत अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. त्या भागात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची सतत ये-जा असते. तेथील अस्वच्छतेमुळे महापालिकेच्या कामाबद्दल गैरसमज निर्माण होत होता. शहराची प्रतिमा स्वच्छ आणि सुंदर राहावी, यासाठी महापालिकेने कटक मंडळाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या सफाईचा निर्णय घेतला आहे. यासाठी कटक मंडळाच्या प्रशासनानेदेखील मंजुरी दिली आहे.
