पुणे : ‘कला या संवादी आहेत. संगणक, लॅपटॉप, आयपॅड, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही साधने आहेत. तंत्रज्ञानापेक्षा मानवी मेंदू श्रेष्ठच आहे. सर्जनशीलता आणि भावना ही या तांत्रिक माध्यमातून कधीच साकारली जाणार नाही याचे भान ठेवून कलाकाराने पुढे जायला पाहिज,’ असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी रविवारी व्यक्त केले.
संवाद पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या प्रदर्शन आणि मार्गदर्शन सत्रांचा समारोप शि. द. फडणीस यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. शंभराव्या वर्षातील पदार्पणाबद्दल फडणीस यांचा प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, प्रा. राधाकृष्ण पाटील, सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, शारंगधर साठे डॉ. अनुपमा पाटील या वेळी उपस्थित होते.
फडणीस म्हणाले, ‘चित्रकला हे व्यक्त होण्याचे पहिले माध्यम असून, त्यानंतर शिल्प, नृत्य, भाषा, संगीत असा कला प्रवास घडला आहे. माणसाने उपजीविकेसाठी कुठल्याही प्रांतात शिक्षण घेतले, तरी कायम एखादी कला जोपासावी. एकटेपणात कलाच माणसाची सोबत असते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणक्रमाबरोबरच कला शिकता येणार असून त्याचे गुणही मिळणार आहेत. हा महत्त्वाचा बदल स्वागतार्ह आहे.’