पुणे : ‘तुझे आहे तुज पाशी’चा नाट्यप्रवेश, ‘असा मी असा मी’ या एकपात्री प्रयोगाचा काही अंश तसेच स्वरबद्ध केलेल्या आणि रूपेरी पडद्यावरील अभिनयातून रंगविलेल्या गीतांच्या बहारदार सादरीकरणातून महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना त्यांच्याच अजरामर साहित्यकृती आणि गीतांतून स्मरण करीत अभिवादन करण्यात आले.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचातर्फे आयोजित ‘बहुरंगी, बहुढंगी भाई’ या विशेष कार्यक्रमात रसिकांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे नानाविध पैलू अनुभवले. केतकी पांडे आणि सुबोध चितळे यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील गीता आणि आचार्य यांच्यातील नाट्यप्रवेश सादर केला. त्यानंतर चितळे यांच्या एकपात्री सादरीकरणातून ‘असा मी असा मी’ची प्रभावी मांडणी उलगडली. ‘पुलोत्सव’चे संयोजक वीरेंद्र चित्राव, प्रसिद्ध अर्कचित्रकार चारुहास पंडित, भाग्यश्री पंडित, आनंद सराफ, राम कोल्हटकर, गज़लकार प्रदीप निफाडकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्या सविता केळकर, माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे या वेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांनी पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली, तसेच चित्रपटात अभिनय केलेली गीते सादर केली. ‘नाच रे मोरा’, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘करू देत शृंगार’, ‘तुझ्या मनात कुणी तरी लपलंय गं’, ‘हसले मनी चांदणे’, ‘इथेच टाका तंबू’, ‘ही कुणी छेडिली तार’, ‘माझिया माहेरा जा’, ‘जाळीमंदी पिकली करवंद’ ही गीते त्यांनी बहारदारपणे सादर करून रसिकांची मने ‘पुल’कित केली. रवींद्र खरे यांच्या निवेदनातून पुलंचे विविध पैलू उलगडले. मनीषा निश्चल यांना प्रसन्न बाम, अभय इंगळे, अमित कुंटे यांनी समर्पक साथसंगत केली. वीरेंद्र चित्राव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले.

पूना गेस्ट हाऊसच्या वास्तूत आल्यानंतर अनेक आठवणी जागृत होतात. रसिकांनी स्वत:चे मनोरंजन आणि स्मरणरंजन करण्यापेक्षा मराठी साहित्य क्षेत्रातील थोर साहित्यिकांच्या साहित्य संपदेची जपणूक करणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी या साहित्यिकांचे विचार समाजापुढे आणून त्यांचे संवर्धन करत पुढील पिढीपर्यंत नेणे गरजेचे आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचाच्या माध्यमातून किशोर सरपोतदार आणि कुटुंबीय हा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहेत. – वीरेंद्र चित्राव, संयोजक, ग्लोबल पुलोत्सव