पुणे : देशभरात जनगणनेचे काम जोरदार सुरू आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांबरोबरच सरकारी कार्यालयात अनेक कर्मचाऱ्यांना हे जनगणनेचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार जनगणना करण्यासाठी प्रगणक म्हणून नियुक्ती केलेले कर्मचारी घरोघरी जाऊन काम करत आहेत.

जनगणनेसाठी येणारे कर्मचारी नक्की कशासाठी हे काम करत आहेत. याची माहिती नसल्याने नागरिकांकडून त्यांना विरोध केला जात आहे. तर काही भागात किरकोळ वादाचे प्रकार देखील घडत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी जनगणनेसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी.

झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात जनगणना करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी देण्याची व्यवस्था करावी,’ असे पत्र महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.

पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जनगणनेचे काम करणारी महिला कर्मचारी आणि तिच्या मुलावर या भागातील १० ते १२ जणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जनगणना करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने हे काम करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या महिला प्रगणक बिबवेवाडी भागातील एका वसाहतीमध्ये गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यावर हल्ला झाला.

जनगणना करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून मारहाण करण्याचा प्रकार निंदनीय असून, या विरोधात कडक भूमिका घेऊन संबंधित हल्लेखोरांना अटक करावी, असे पत्र महापालिकेने पोलीस प्रशासनाला दिले आहे. तसेच, जनगणनेचे काम करण्यासाठी झोपडपट्टी वा संवेदनशील भागात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त द्यावा, असे पत्र पोलीस आयुक्तांना दिल्याचे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले.

‘ज्या भागात जनगणनेचे काम सुरू आहे, तेथे पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. झोपडपट्टी भागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनाही पाठविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

‘नगरसेवकांनी जनजागृती करावी’

जनगणना करण्यासाठी आलेले कर्मचारी झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यासाठी आले असल्याचा अनेक नागरिकांचा गैरसमज होत आहे. जनगणना करताना विचारण्यात येत असलेल्या प्रश्नातून आपले घर पाडले जाईल, आपल्या घराची संपूर्ण माहिती महापालिकेकडे जाईल, या भीतीने अनेक रहिवासी कर्मचाऱ्यांना माहिती देत नाहीत. त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यामधूनदेखील वादावादीचे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण पालिकेतील अधिकाऱ्यांनी नोंदविले. ‘नागरिकांमध्ये जनगणनेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नगरसेवकांनाही जनजागृती करण्यासाठी सांगण्यात येणार आहे,’ असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.