पुणे : जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा दाखविल्याने महापालिकेच्या येरवडा -वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी ही कारवाई केली. जनगणनेच्या कामात यापुढील काळात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे नायर यांनी सांगितले.
महापालिकेच्या येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जनगणनेच्या कामकाजासाठी प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश राजेश गुर्रम यांची ‘जनगणना अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील जनगणना संचालनालयाच्या परिपत्रकांनुसार हे कामकाज कालबद्ध मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक होते. यामध्ये ‘सीएमएमएस पोर्टल’वर प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या नोंदी करणे, नियुक्ती पत्रे देणे, घरयादी गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे आणि दैनंदिन कामाचा आढावा घेणे, अशा जबाबदाऱ्या गुर्रम यांच्याकडे होत्या.
गुर्रम यांनी उपलब्ध मनुष्यबळाचे आवश्यक असलेले नियोजन न केल्यामुळे या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेले जनगणनेचे काम रखडले. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये गुर्रम यांना कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत कामात टाळाटाळ केली आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या आदेशाला हरताळ फासला, असा ठपका त्यांच्यावर ठेवून अतिरिक्त आयुक्त नायर यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने शिक्षकांसह महापालिकेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रगणक म्हणून केली आहे. त्यांना जनगणनेच्या कामाचे प्रशिक्षण आणि ‘जनगणना किट’ देण्यात आले. हे साहित्य घेतल्यानंतर आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरही अनेक प्रगणक कामावर गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण आणि साहित्य घेतलेले आहे आणि अद्यापही कामाला सुरुवात केली नाही, त्यांनी तातडीने रुजू होऊन कामाला सुरुवात करावी, अन्यथा त्यांच्यावर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत शिस्तभंग व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
कामकाज अद्यापही सुरू नाही
या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एकूण १०३९ प्रगणक गटांपैकी केवळ ५४० गटांचेच काम सध्या सुरू आहे, तर तब्बल ४९९ प्रगणक गटांचे कामकाज अद्याप सुरूच झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे.
