पुणे : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलांकडील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. नगर रस्ता, हडपसर परिसरात या घटना घडल्या.
याबाबत एका विवाहित तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी १९ मे रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास नगर रस्त्यावरील विठ्ठलवाडी भागातील पीएममी थांब्यावर थांबली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरांनी तिच्या गळ्यातील एक लाख ३९ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत हडपसर भागात २६ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.