चाकण औद्योगिक क्षेत्र संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेचे. जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आणि लाखो जणांना रोजगार देणाऱ्या या औद्योगिक क्षेत्राला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण कधी सुटणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मर्सिडीज बेंझ, ह्युंदाई, जीई एरोस्पेस यांसह इतर अनेक जागतिक पातळीवरील कंपन्यांचे चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत. या कंपन्यांचे प्रकल्प पुणे जिल्ह्यात असणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब. प्रत्यक्षात एका बाजूला आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांची बोंब असे विरोधाभासी चित्र सध्या चाकणमध्ये दिसून येत आहे. लाखो जणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या क्षेत्राची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे. हवालदिल झालेले उद्योग या परिस्थितीत सुधारणा कधी होणार, अशी विचारणा करीत आहेत.

चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपले स्वागत होते ते रस्त्यांवरील खड्ड्यांनी. या खड्ड्यांतून वाट काढून पुढे जाण्याची प्रत्येकाची कसरत सुरू असते. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला मागे टाकण्याच्या ईर्ष्येने वाहन चालवत असतो. खड्डेमय रस्ते, त्यातून सुसाट सुटलेली वाहने आणि सगळीकडे पसरलेली धूळ हे चित्र सध्या पुण्यातील आघाडीचे औद्योगिक क्षेत्र असलेल्या चाकणचे आहे. चाकणमधील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. काही प्रकल्पांसाठी भूसंपादनही सुरू आहे. मात्र, हे करीत असताना सध्याच्या रस्त्यांची अवस्था काय आहे, याकडे कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नाही.

चाकणधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांसह नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चानंतरही चाकणमधील परिस्थिती सुधारलेली नाही. चाकण इंडस्ट्रीज असोसिएशनचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांच्याकडूनही सातत्याने विविध शासकीय यंत्रणांकडे पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्याही प्रयत्नांना फारसे यश येताना दिसून येत नाही. मध्यंतरी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रणांची झाडाझडती घेतली. त्यानंतर शासकीय यंत्रणांकडून प्रत्यक्षात उपाययोजना सुरू होतील, अशी आशा होती. आजची चाकण औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती पाहता ती आशाही फोल ठरली आहे.

जागतिक पातळीवरील एका बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चाकणमधील दुरवस्थेमुळे होणारा त्रास मांडला. त्यांनी सांगितले की, आमचे वरिष्ठ अधिकारी भारतात येतात, त्या वेळी ते चाकणला येण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे पुणे शहरातच या अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा वाहतूककोंडीत वाया जाणारा वेळ वाचतो. चाकणमधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, वाहतूककोंडीतही भर पडत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचाही अधिक वेळ प्रवासात जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित बस आम्ही सुरू केल्या आहेत. चाकणमधील परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात गुंतवणूक येणार नाही.

कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात

चाकणमधील पायाभूत सुविधांबाबत मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी संतोष अय्यर म्हणाले, की चाकणमधील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी स्थानिक यंत्रणांशी आम्ही समन्वय साधत आहोत. चाकणमधील रस्त्यांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे. वाढत्या नागरीकरणासोबत पायाभूत सुविधा वाढविण्याचे आव्हान आहे. रस्त्यांची स्थिती सुधारायलाच हवी; परंतु, त्यासोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हायला हवी. यंत्रणांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांना गती मिळणे आवश्यक आहे.
sanjay.jadhav@expressindia.com