पुणे : पुण्यातील चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांकडून येथे गुंतवणूक केली जात आहे. चाकण आणि तळेगावमधील औद्योगिक परिसंस्थेचा झपाट्याने विकास होत असल्याने पुण्याने आता मुंबईला मागे टाकले आहे. पुण्यातील निर्मिती क्षेत्र आणि ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे.
‘कॉलिअर्स इंडिया’ने देशातील औद्योगिक गोदाम क्षेत्राचा एप्रिल ते जून तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात दुसऱ्या तिमाहीत औद्योगिक गोदामांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार १ कोटी ९ लाख चौरस फुटांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते १ कोटी ५ लाख चौरस फूट होते. त्यात या वर्षी ४ टक्के वाढ नोंदविण्यात आली. पुण्यात यंदा दुसऱ्या तिमाहीत गोदामांच्या मागणीत ६४ टक्के वाढ झाली आहे तर मुंबईत त्यात २४ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. पुण्यात दुसऱ्या तिमाहीत १८ लाख चौरस फुटांचे गोदामांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार झाले. गेल्या वर्षी ते याच तिमाहीत ११ लाख चौरस फूट होते. मुंबईत १६ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले असून, गेल्या वर्षी ते २१ लाख चौरस फूट होते. मुंबईपेक्षा पुण्यात गोदामांचे व्यवहार दोन लाख चौरस फुटांनी अधिक झाले आहेत. त्यामुळे पुण्याने मुंबईला मागे टाकल्याचे चित्र आहे.
देशात दुसऱ्या तिमाहीत नवीन गोदामांचा पुरवठा १ कोटी २२ लाख चौरस फूट झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ कोटी चौरस फूट होता. पुण्यात दुसऱ्या तिमाहीत २३ लाख चौरस फूट पुरवठा झाला असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ६ लाख चौरस फूट होता. त्यात २८३ टक्के वाढ नोंदविण्यात आली. देशातील महानगरांमध्ये मुंबईत दुसऱ्या तिमाहीत नवीन गोदांमांचा पुरवठा सर्वाधिक असून, तो २५ लाख चौरस फूट झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १५ लाख चौरस फूट होता आणि आता या वर्षी ६७ टक्के वाढ झालेली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
दुसऱ्या तिमाहीतील मोठे गोदाम व्यवहार
मुंबई – अॅमेझॉनकडून भिवंडीत ५ लाख २७ हजार ९०० चौरस फूट
पुणे – चाकण, तळेगावमध्ये एनव्हिजन एनर्जीकडून ३ लाख चौरस फूट
युद्धाचा परिणाम नाही
पश्चिम आशियातील युद्ध सुरू असतानाही देशातील औद्योगिक गोदाम क्षेत्राने वाढ नोंदविली आहे. त्यात प्रामुख्याने त्रयस्थ संस्था मालवाहतूकदार क्षेत्राचा वाटा मोठा आहे. त्याखालोखाल अभियांत्रिकी आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून गोदामांना मागणी वाढलेली दिसत आहे. देशांतर्गत निर्मिती क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असल्याने गोदामांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे, असे कॉलिअर्स इंडियाचे राष्ट्रीय संचालक विमल नाडर यांनी सांगितले.
