पिंपरी : चाकण एमआयडीसी परिसरातील ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी, वाहन बंद पडल्याचे दिसेल. त्यानुसार तत्काळ कार्यवाही केली जाईल. या पद्धतीने वाहतूक कोंडी सोडविली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. खड्डे, साईड पट्ट्या, रस्त्यावर उभी केली जाणार वाहने, अतिक्रमण, नियमांचे उल्लंघनामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे चाकणमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडली. आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी),महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महसूल, नगरपरिषद अशा सर्वा संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
रस्त्यांची दुरवस्था असून खड्डे, साईट पट्टे खराब आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन कोंडी होत आहे. कामगारांचे सकाळी दोन आणि सायंकाळी दोन असे चार तास वाहतूक कोंडीत जातात. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्यात येणार आहेत. एकही दिवस विलंब झाल्यास अभियंते, कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. कंत्राटदार कोणाचा, कोणाशी संबंधित आहे, याच्याशी काही देणेघेणे नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावली प्रमाणे खड्डे बुजविले जातील. त्याचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. ज्या संस्था जबाबदारी पाळणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चाकण चौकाजवळील १९ किलोमीटर परिसरात सर्वाधिक कोंडी असते. पहिल्या टप्प्यात या भागात कामे केली जाणार असून चार महिन्यात तेथील समस्या निकाली निघेल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महसूल व पोलीस विभागांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असताना निर्माण होणारा समन्वयाचा अभाव दूर करून एकत्रितपणे उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
