पुणे : चंदननगर भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेत ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. पोलिसांना याबाबतची माहिती ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने दिल्यानंतर त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येपासून परावृत्त केले.

चंदननगर भागात एका सोसायटीत ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. सोमवारी सायंकाली सातच्या सुमारास महात्मा फुले पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी तलवारे, सतीश कतारी हे गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस नियंत्रण कक्षाशी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने संपर्क साधला. वडील आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी तलवारे, कतारी यांनी संबंधित सोसायटीत धाव घेतली.

पोलिसांनी सदनिका शोधून काढली. तेव्हा सदनिकेचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर तलवारे आणि कतारी यांनी क्षणाचा विलंब न लावता त्वरीत एका वेल्डींग कारागिराशी संपर्क साधला. वेल्डींग कारागिराने आतून बंद असलेला दरवाजा उघडला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक गळफास घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहिले.

‘पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला धीर देऊन खाली उतरविले. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. रग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घाव घेऊन ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलीस कर्मचारी तलवारे आणि कतारे यांनी केलेल्या कामगिरीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात दोघांचा सत्कार करण्यात आला’, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.

बिबवेवाडी, कोंढव्यात घरफोडी

बिबवेवाडी, कोंढवा परिसरात चोरट्यांनी दोन सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडीतील रम्यनगरनगरी हाऊसिंग सोसायटीत सदनिकेतून चोरट्यांनी मोबाइल संच आणि मनगटी घड्याळ असा ९१ हजार मुद्देमाल लांबविल्याची घटना सोमवारी (२७ एप्रिल) घडली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाने सोमवारी सकाळी सदनिकेला बाहेरुन कडली लावली. कामानिमित्त सोसायटीच्या आवारात तक्रारदार गेला. चोरट्याने संधी साधली. सदनिकेची कडी उघडून चोरटा घरात शिरला. चोरट्याने मोबाइल संच, महागडे घड्याळ असा मुद्देमाल लांबविला. पाेलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.

कोंढवा परिसरातील शिवनेरीनगरमध्ये सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि सोन्याचे बिस्कीट असा एक लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे शिवनेरीनगरमधील महम्मद सैफ टाॅवर या सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून ऐवज लांबविल्याची घटना २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.