पुणे : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गाला गती मिळाली आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन उद्या (दि.१७) होणार आहे. हा पहिला टप्पा पुण्यातील खराडी जकात नाका ते शिरूर बाह्यवळण मार्ग असा ५३.४ किलोमीटरचा असेल. या महामार्गामुळे पुण्यातून अहिल्यानगरसह मराठवाड्याकडे प्रवास आता सुसाट होणार आहे.

पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उन्नत महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प एकूण ५३.४ किलोमीटर लांबीचा असेल. त्यात ३५ किलोमीटरचा सहापदरी उन्नत महामार्ग असेल. पुणे ते कोंढापुरी असा हा उन्नत महामार्ग असेल. हा देशातील सर्वांत लांब सहापदरी उन्नत महामार्ग ठरणार आहे. याचबरोबर सध्या असलेला महामार्ग अद्ययावत करून तो सहापदरी करण्यात येईल आणि त्याची लांबी १८.४० किलोमीटर असेल. हा मार्ग खराडी येथून सुरू होऊन शिरूरमध्ये संपेल. नियोजित रामवाडी ते वाघोली हा मेट्रो मार्ग याच महामार्गावरून जाणार आहे. त्यामुळे तिथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल ११.६ किलोमीटरचा असेल. त्यात पहिल्या पातळीवर सहापदरी रस्ता आणि दुसऱ्या पातळीवर मेट्रो मार्गिका असेल.

या द्रुतगती महामार्गामुळे पुणे ते शिरूर या औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीला गती मिळणार असून, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. हा महामार्ग लोणीकंदजवळ बाह्य वर्तुळाकार मार्गाशी जोडला जाणार आहे. हा प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण केला जाणार असून, त्यावर २५ वर्षे पथकर (टोल) आकारणी केली जाणार आहे. या महामार्गाची क्षमता प्रतिदिन ३० हजार प्रवासी वाहने आहे. या महामार्गावरून सध्या प्रतिदिन ६६ हजार ६९६ प्रवासी वाहने धावतात. या महामार्गावर भविष्यात प्रतिदिन १ लाख ६ हजार प्रवासी वाहने धावतील.

सर्वांगीण विकासाला गती

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. हा केवळ रस्ते विकास प्रकल्प नसून, भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उभारला जाणारा अत्याधुनिक वाहतूक कॉरिडॉर आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी, सुरक्षित रचना, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीच्या माध्यामातून हा प्रकल्प पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

प्रकल्पाची वैशिष्टे

  • एकूण लांबी – ५३.४० किलोमीटर
  • उन्नत मार्ग – ३५ किलोमीटर
  • सध्याच्या महामार्गाचे सहापदरीकरण – १८.४० किलोमीटर
  • एकूण खर्च – ७ हजार ५१५ कोटी रुपये