मुबंईहून साताऱ्याला जाताना मुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर, या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी तातडीने आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वत: अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.

कोथरूड येथील चांदणी चौकात उड्डाणपूल आणि महामार्ग रुंदीकरण सुरू आहे. त्यामुळे तेथे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न भीषण झाला आहे. दररोजच्या या वैतागवाडीचा फटका शुक्रवारी खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा सूस येथून ते चांदणी चौकाकडे येत होता. मात्र, चौकातील कोंडीमुळे वाहनांच्या रांगा पाषाणपर्यंत पोहचल्या. त्यात मुख्यमंत्रीही अडकले. या महामार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने ताफ्याची सुटका कशी करायची? या गोंधळात वाहतूक पोलिसांचीही तारांबळ उडाली.

पुण्यातील वाहतूककोंडीत अडकला मुख्यमंत्र्यांचा ताफा

दरम्यान, वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, महामार्ग प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना शिंदे यांनी फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पहाणी करणार आहेत, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोंडीसंदर्भात स्थानिक प्रवाशांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढेच गाऱ्हाणे मांडले.

मुख्यमंत्र्यांनीही तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन संपर्क केला आणि शनिवारी येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यास सांगितले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वत: अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.