पुणे : ‘सण उत्सव आनंद देतात, शिक्षा नाही’, ‘माझे डोळे, माझे कान, माझं हृदय, माझा अधिकार’, अशा घोषणा, फलक आदींच्या माध्यमांतून पुणेकरांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात ‘डीजे’मुक्त उत्सवांची मागणी केली. बाजीराव रस्त्यावरही ज्येष्ठ नागरिकांनी ‘डीजे’विरोधात मोर्चा काढला. ‘कोणत्याही धर्माचा सण असो, ‘डीजे’चा कर्णकर्कश आव्वाज नकोच. त्यासाठी कठोर नियम आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी,’ अशी भूमिका आंदोलक नागरिकांनी मांडली.

सध्या ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवावरून पुण्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकातील कलाकार कट्ट्यावर एकत्र येऊन पुणेकरांनी ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवाची मागणी केली. गणेशोत्सवाबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी पुणेकर नागरिकाने ध्वनिवर्धकांचा वापर न करण्याची मागणी केली होती. यावरून चांगलाच गदारोळ उडाला. त्यानंतर सणांच्या दरम्यान ध्वनिवर्धकांचा वापर हा विषय शहरात ऐरणीवर आला आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या यशोधरा गाडगीळ म्हणाल्या, ‘सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. त्याचप्रमाणे कर्कश आवाजाच्या ध्वनिक्षेपक भिंतींवरही कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे. हे निर्बंध सर्वच धर्माच्या सण-समारंभ, जयंती आणि लग्न कार्यांवर असावेत. त्याबरोबरच वाद्यपथके आणि साधे ध्वनिवर्धक यांच्यासाठीही आवाजाची मर्यादा गरजेची आहे. प्रशासनाने या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करायला हवी.’

‘गेली काही वर्षे, सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या, कर्णकर्कश आवाजातील ध्वनिवर्धकांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे. त्या संदर्भात गणेश मंडळांबरोबर झालेल्या सभेमध्ये आयुक्तांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. तर, महापौर मंजूषा नागपुरे यांनी ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही’ अशी भूमिका मांडली. महापौर, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या एकत्रित अपयशामुळे पुणेकरांना रस्त्यावर उतरावे लागले,’ अशी टीका आंदोलनात सहभागी झालेल्या आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली.

‘शहरातील ध्वनी प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लहान मुलांना, ज्येष्ठांना त्याचा मोठा त्रास होतो. सर्वच जाती-धर्मांचे सण हे उत्साहाने साजरे व्हायला पाहिजेत. त्यासाठी पारंपरिक वाद्ये आणि साधने वापरावीत,’ असे आवाहनही त्यांनी केले.

बाजीराव रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा

ध्वनी प्रदूषणाविरोधात बाजीराव रस्त्यावर रविवारी ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. बाजीराव रस्त्यावरून शनिवार वाड्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ‘कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या भिंतींमुळे लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी डीजेवर बंदी आणि ध्वनी मर्यादेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी या वेळी करण्यात आली.