पुणे : पुणे शहर आणि परिसरातील रात्रीच्या किमान तापमानात अचानक घट झाली आहे. दिवसा अंशत: पावसाळी स्थिती आणि रात्री निरभ्र आकाशामुळे तापमानात घट होत आहे. शनिवारी (२४ सप्टेंबर) किमान तापमान अनेक दिवसांनंतर २० अंशांच्या खाली आले. येते चार-पाच दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, दिवसा अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही भागांत पावसाचा शिडकावाही होत आहे. अशा वातावरणात दिवसा मुळातच जमिनीचे तापमान कमी होत आहे. त्यानंतर रात्री बहुतांश भागात निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता वातावरणात निघून जात असल्याने रात्रीच्या किमान तापमानात गेल्या दोन-तीन दिवसांपासून घट दिसून येत आहे. शनिवारी तापमानात आणखी घट दिसून आली.

पुणे वेधशाळेच्या शिवाजीनगर केंद्रात शनिवारी १९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे तापमान १.४ अंशांनी कमी होते. त्यामुळे रात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत होता. दिवसाचे कमाल तापमानही काही प्रमाणात सरासरीच्या खाली ३०.१ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. शहराच्या पूर्व भागात लोहगाव केंद्रावर मात्र रात्रीचे किमान तापमान अद्यापही २० अंशांच्या पुढे आहे. या भागांत दिवसाचे कमाल तापमान कमी होऊन ते २९.८ अंशांपर्यंत खाली आले होते.

महिनाअखेरपर्यंत तापमानात घट

रात्रीच्या किमान तापमानातील घट सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत किमान तापमान १८ ते १९ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. दिवसाचे कमाल तापमानही ३० अंशांच्या आसपास राहील. त्याचप्रमाणे महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार असून, हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.