पुणे : पुण्याचा परीघ दिवसेंदिवस विस्तारत आहे. वर्तुळाकार मार्गासह पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती पुण्याचा पुढील दिशा विस्तार असणार आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत प्रत्येक शहराचा विस्तार होत असतो. हे प्रकल्प त्या शहराच्या विस्ताराला दिशा देतात. पुण्याच्या विस्तारातही पायाभूत सुविधा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

भविष्यातही हे प्रकल्प पुण्याचा भौगोलिक विस्तार ठरवणार आहेत. पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. या विमानतळासाठी भूसंपादनाची पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे आगामी काळात पुरंदरमध्ये विकासाला चालना मिळणार आहे. याचवेळी पुण्याभोवतीच्या वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) भूसंपादन सुरू आहे. या मार्गाच्या भोवतीने विकास होण्यास मदत होणार आहे. पुरंदर विमानतळ आणि वर्तुळाकार मार्ग या दोन गोष्टी भविष्यात पुण्याच्या विकासाची दिशा ठरविणार आहेत. या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे त्या परिसरातील गृहबांधणी क्षेत्राला गती मिळालेली दिसून येत आहे.

मॅजिकब्रीक्सच्या ताज्या अहवालानुसार, पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन घरांच्या पुरवठ्यात १४.८ टक्के घट झाली आहे. तरीही यंदा घरांच्या मागणीत मात्र २.१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यात घरांच्या सरासरी किमतीत ४१.४ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. घरांच्या मागणीत ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ५८ टक्के आहे. वर्तुळाकार मार्गाशी संलग्न असलेल्या भागांमध्ये घरांच्या मागणी आणि पुरवठ्यात वाढ होताना दिसून येत आहे.

त्यात प्रामुख्याने आंबेगाव, हिंजवडी, मोशी, चाकण, चिखली, पिरंगुट आणि वाघोली यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या मागणीत हिंजवडीत १५.१७ आणि आंबेगावमध्ये १३.६१ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी घरांच्या किमतीत गेल्या ३ वर्षांत वाघोलीत ८२.०२ टक्के, हिंजवडी ४४.४८ टक्के आणि मोशीत ३६.९ टक्के वाढ झाली आहे. या भागात ९७ टक्के मोठे गृहप्रकल्प असून, ५० लाख रुपयांपर्यंत आणि ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत किमतीच्या घरांना पसंती मिळत आहे.

प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्या दिशेच्या परिसरातील निवासी बाजारपेठेत तेजी दिसून येत आहे. कोंढवा, हडपसर, फुरसुंगी, हांडेवाडी, पिसोळी, सासवड, शेवाळवाडी आणि उंड्री या भागांमध्ये गृहप्रकल्पांचे प्रमाण वाढले आहे. विमानतळाच्या भूसंपादनाचे पाऊल उचलण्यात आल्यापासून घरांच्या मागणीत कोंढव्यात १५.४७ टक्के आणि फुरसुंगीत १४.२० टक्के वाढ झाली आहे.

फुरसुंगीतील घरांच्या सरासरी दर २०२३ मध्ये प्रतिचौरस फूट ४ हजार ७७३ रुपये होता आणि तो आता ६ हजार २१७ रुपयांवर पोहोचला आहे. याचवेळी हडपसरमध्ये हा दर आता १० हजारांवर पोहोचला आहे. घरांची मागणी जास्त असलेल्या भागात घरभाड्यातही वाढ होताना दिसून येत आहे. हिंजवडी, खराडी, वाकड, बाणेर, कोथरूड, विमाननगर, हडपसर, वाघोली, बालेवाडी, पुनावळे, मगरपट्टा आणि ॲमनोरा पार्कमध्ये भाडे सर्वाधिक आहे, असे मॅजिकब्रीक्सच्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

मेट्रो प्रकल्पामुळे गती

पुणे परिसरातील मेट्रो मार्गाच्या परिसरात घरांच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे. मेट्रो मार्गिकेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय उपलब्ध असल्याने नागरिक मेट्रो स्थानकांच्या परिसरातील घरांना पसंती देत आहेत. भविष्यात मेट्रो हे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग बनणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गांचा आगामी काळात होणारा विस्तारही शहराच्या विस्ताराची दिशा ठरविणारा असेल.

sanjay.jadhav@expressindia.com