scorecardresearch

पुणे: शहरात आठवड्यापासून उकाडाच; ऐन थंडीत कमाल, किमान तापमान सरासरीपुढे

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम एकूणच महाराष्ट्रातील थंडीवर झाला.

पुणे: शहरात आठवड्यापासून उकाडाच; ऐन थंडीत कमाल, किमान तापमान सरासरीपुढे
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता

पुणे शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यापासून ऐन थंडीच्या हंगामातील डिसेंबरमध्ये उकाड्याची स्थिती कायम आहे. हळूहळू शहरातील अंशत: ढगाळ स्थिती निवळत असताना पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण होऊ शकतो.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम एकूणच महाराष्ट्रातील थंडीवर झाला. रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आवश्यक असताना सातत्याने सरासरीपार जात आहे. त्यामुळे थंडीच्या हंगामात उकाड्याची स्थिती जाणवत आहे. पुणे शहर आणि परिसरातही डिसेंबरमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. ९ आणि १० डिसेंबरला शहर आणि परिसरात कोरड्या हवामानाची स्थिती होती. त्याच वेळेला उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे या दोन दिवसांत शहरातील रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी घट होऊन ते ८ ते ९ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर मात्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ स्थिती निर्माण होऊन तापमानात सातत्याने वाढ होऊन ते सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी वाढले. किमान तापमान १० किंवा १२ अंशांच्या आसपास राहण्याऐवजी ते २० ते २२ अंशांपर्यंत वाढले. त्यामुळे हवेतील गारवा पूर्णत: नाहिसा झाला.

हेही वाचा >>> पुणे: कुरिअरच्या वेष्टनातून चरस, गांजाची ऑनलाइन विक्री; ‘थर्टीफस्ट’च्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांचे तस्कर सक्रीय

सध्या शहरात दिवसाचे कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानातील वाढ कायम आहे. दोन्ही वेळेचे तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले आहे. त्यामुले रात्री काहीसा उकाडा आणि दिवसा उन्हाचा हलका चटका जाणवतो आहे. शनिवारी (१७ डिसेंबर) शहरात १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ६.१ अंशांनी अधिक होते. दिवसाचे कमाल तापमान ३१.७ अंशांवर होते. तेही सरासरीच्या तुलनेत २.६ अंशांनी अधिक होते.

तापमानात घटण्याची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात अद्यापही काही प्रमाणात संध्याकाळनंतर आकाश ढगाळ होत आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचा हा परिणाम आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. याच काळामध्ये उत्तरेकडील काही राज्यांमध्ये थंडीच्या लाटेची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहरातील रात्रीच्या किमान तापमानात दोन-तीन दिवसांच्या कालावधीत २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी रात्री काही प्रमाणात गारवा अवतरणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 23:55 IST

संबंधित बातम्या