पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती परिसरात विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शहरातील व्यापारी पेठा, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील घाऊक फळभाजी, भुसार बाजार बंद ठेवण्यात आला. लक्ष्मी रस्त्यासह महात्मा फुले मंडई, तसेच उपनगरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने गुरुवारी शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाच्या आवारातील फळभाजी बाजार, भूसार बाजार, तसेच मांजरी, मोशी, खडकी, उत्तमनगर येथील उपबाजार बंद ठेवण्यात आला.

मुख्य बाजारासह उपबाजारात गुरुवारी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस पाठविला नाही. लक्ष्मी रस्ता, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भवानी पेठेतील भूसार बाजार, टिंबर मार्केट परिसरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून फलक लावण्यात आले होते. एरवी दररोज सकाळी शहातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी असते. गुरुवारी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला.